Sunil Gavaskar Statement On Vaibhav Sooryavanshi: येत्या काही दिवसांत भारतीय संघ अफगाणिस्तानविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील तिन्ही सामने दिल्लीतील अरूण जेटली क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर खेळवले जाणार आहेत. ही मालिका झाल्यानंतर भारतीय संघ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी जपानला रवाना होणार आहे. या स्पर्धेची सुरूवात १९ सप्टेंबरपासून होणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयकडून भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. श्रेयस अय्यर या युवा खेळाडूंच्या संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे.
या स्पर्धेआधी भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावसकर यांनी भारतीय संघाचं कौतुक केलं आहे. यासह जसप्रीत बुमराहच्या खेळण्याबाबतही मोठं वक्तव्य केलं आहे. आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीत जसप्रीत बुमराहची भारतीय संघात निवड करण्यात आली आहे. याबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “आशियाई क्रीडा स्पर्धा झाल्यानंतर न्यूझीलंडचा दौरा सुरू व्हायला बराच वेळ आहे. त्यामुळे जसप्रीत बुमराहला आशियाई क्रीडा स्पर्धेत खेळवणं हा चांगला प्लॅन आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने त्याला न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेआधी गोलंदाजी करण्याची संधी मिळेल.”
वैभव सूर्यवंशीबद्दल बोलताना सुनील गावसकर काय म्हणाले?
आशियाई क्रीडा स्पर्धेत एकापेक्षा एक थरारक सामने पाहायला मिळू शकतात. कारण टी-२० क्रिकेटमध्ये कुठल्याही संघाला कमबॅक करण्यासाठी फार वेळ लागत नाही. एका षटकात सामना कुठल्याही संघाच्या बाजूने फिरू शकतो. पाकिस्तानचा संघ चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतोय. पण अफगाणिस्तान,बांगलादेश आणि श्रीलंका या तिन्ही संघांनी गेल्या काही वर्षांत दमदार खेळ केला आहे. त्यामुळे भारतीय संघासमोरही कडवं आव्हान असणार आहे. पण युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. वैभवबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले, “टी-२० क्रिकेटमध्ये तु्म्ही एखाद्या फलंदाजाकडून सातत्याने चांगल्या कामगिरीची अपेक्षा करू शकत नाही. कारण कुठल्याही फलंदाजासाठी असं करणं मुळीच सोपं नाही. पण तो असा फलंदाज आहे, जो १० पैकी ३-४ डावात तुफान फटकेबाजी करून आपल्या संघाला सामना जिंकून देऊ शकतो. इतर सामन्यांमध्ये तो ५० हून अधिक करेलच असं नाही, पण तो वेगवान सुरूवात नक्कीच करून देऊ शकतो.”
तसेच श्रेयस अय्यरबाबत बोलताना सुनील गावसकर म्हणाले की, “श्रेयस अय्यरकडे नेतृत्वाचा दांडगा अनुभव आहे. आपण त्याला केकेआर, दिल्ली कॅपिटल्स आणि पंजाब किंग्स संघाचं नेतृत्व करताना पाहिलं आहे. त्यामुळे त्याच्याकडे नेतृत्वाचा चांगलाच अनुभव आहे. त्यामुळे या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना त्याच्यावर दबाव असेल, असं मला मुळीच वाटत नाही. पण जेव्हा एखादा खेळाडू देशाचं प्रतिनिधित्व करतो, त्यावेळी त्याच्याकडून खूप अपेक्षा असतात.” गेल्यावेळी झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघाने सुवर्णपदकावर नाव कोरलं होतं. यावेळीही भारतीय संघाकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
