Sunil Gavaskar Statement: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील दुसऱ्या सेमी फायनलचा सामना रंगला. दोन्ही संघांनी मिळून एकूण ४९९ धावा कुटल्या. पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाने २५३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या इंग्लंडचा संघ विजयापासून अवघ्या ७ धावा दूर राहिला. तर सामना जिंकून भारतीय संघाने चौथ्यांदा या स्पर्धेतील अंतिम फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे. या सामन्यातही सलामीला आलेला अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतला. पण अभिषेकचा फॉर्म चिंतेचं कारण नसल्याचं सुनील गावसकर म्हणाले आहेत.
भारतीय संघ या स्पर्धेतील फायनलमध्ये बलाढ्य न्यूझीलंडचा सामना करणार आहे. याआधी झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेतील अंतिम सामन्यातही भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला पराभूत करून जेतेपदाचा मान पटकावला होता. मात्र, यावेळी काही अशा गोष्टी आहेत ज्यामुळे भारतीय संघाची डोकेदुखी वाढू शकते. सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा स्वस्तात बाद होत आहे. तर सूर्यकुमार यादवला चांगली सुरूवात मिळत आहे, पण तो चांगल्या सुरूवातीचं रुपांतर मोठ्या खेळीत करण्यात अपयशी ठरत आहे. दरम्यान इंडिया टूडेवर बोलताना, सुनील गावसकरांनी भारतीय संघाची पॉवरप्लेमधील गोलंदाजी चिंतेचं सर्वात मोठं कारण असल्याचं म्हटलं आहे.
सुनील गावसकर म्हणाले, “मला वाटतं पावरप्लेमधील गोलंदाजी हे भारतासाठी चिंतेचं कारण आहे. कारण गोलंदाज पावरप्लेमध्ये क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं आहे, त्यानुसार गोलंदाजी करत नसल्याचं दिसून येत आहे. २ क्षेत्ररक्षक ३० यार्ड सर्कलच्या बाहेर असताना धावांची गती रोखणं कठीण आहे, हे मला माहीत आहे. पण फलंदाज कोणता शॉट खेळणार आहे, याचा अंदाज लावता येतो. पण जर तुम्ही फलंदाजाला रिव्हर्स स्वीप आणि वेगवेगळे शॉट खेळण्याची संधी देत असाल, तर त्याचं एकच कारण आहे. ते म्हणजे तुम्ही चुकीच्या लाईनवर गोलंदाजी करत आहात.”
वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय संघाकडून संजू सॅमसनने ८९ धावांची वादळी खेळी केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २५३ धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडला हा सामना जिंकण्यासाठी २५४ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना जेकब बेथेलने १०५ धावांची खेळी केली. इंग्लंडला सुरूवातीला मोठे धक्के बसले होते. तरीदेखील, इंग्लंडच्या फलंदाजांनी पावरप्लेमध्ये फलंदाजी करताना ६ षटकात ६८ धावा केल्या.
