जन्मजात हृदयरोगाने जन्मलेल्या मुलांसाठी निरोगी आयुष्याची संधी मिळणे, हाच मोठा आशीर्वाद असल्याचे मत सुनील गावसकरांनी दिले आहे. आज ७२व्या वाढदिवशी गावसकरांनी लहान मुलांच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचे वचन दिले. त्यांचे ‘हार्ट टू हार्ट’ फाउंडेशन गेल्या काही वर्षांपासून श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयात कार्यरत आहे. याद्वारे सुमारे १६,००० मुलांवर विनामूल्य आणि यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली आहे.

सुनील गावसकरांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सांगितले, ”काही वर्षांपूर्वी जन्मजात हार्ट डिसॉर्डरने (सीएचडी) जन्मलेल्या मुलांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘हार्ट टू हार्ट फाउंडेशन’ची स्थापना केली गेली होती. भारतात सीएचडीसह तीन लाखाहून अधिक मुले जन्माला आली. त्यापैकी जवळजवळ एक तृतीयांश मुले त्यांचा पुढचा वाढदिवस पाहण्यासाठी जगत नाहीत.”

पुढे ते म्हणाले, ”फाऊंडेशन श्री सत्य साई संजीवनीच्या तीन रुग्णालयाने सहकार्य करत आहे. यात एक रुग्णालय छत्तीसगडमध्ये, दुसरे हरियाणा मधील पलवल आणि तिसरे नवी मुंबईतील खारघर येथे आहे. या रुग्णालयांमध्ये मुलांची आणि पालकांची शस्त्रक्रिया आणि ‘कॅथ इंटरवेंशन’ संपूर्णपणे विनामूल्य केले जाते. ‘मदर अँड चाइल्ड हेल्थ केअर’ कार्यक्रमांतर्गत आम्ही आतापर्यंत सुमारे ९५,००० माता आणि त्यांच्या मुलांना मदत केली आहे.”

”माझ्या वाढदिवशी मला जास्तीत जास्त लोकांनी मदत करावी आणि मुलांचे प्राण वाचविण्यात सहभागी व्हावे, अशी माझी इच्छा आहे. श्री सत्य साई संजीवनी रुग्णालयाबद्दल लोकांना अधिक माहिती ऑनलाइन पद्धतीने मिळू शकेल”, असे गावसकरांनी सांगितले. या रुग्णालयांमध्ये ‘केवल दिल है बिल नही’ असेही ते म्हणाले.

…तर मच्छीमार झाले असते गावसकर

गावसकरांनी आपल्या ‘सनी डेज’ या पुस्तकात एक रंजक किस्सा सांगितला आहे. जेव्हा गावसकरांचा जन्म झाला होता, तेव्हा त्यांच्या कानावर एक जन्मखूण होती. ही खूण त्यांच्या काकांनी पाहिली होती. दुसऱ्या दिवशी काका जेव्हा रुग्णालयात आले, तेव्हा त्यांना कळले की आपण अंगावर घेतलेले मुल दुसरेच आहे. रुग्णालयात शोधाशोध केली असता, त्यांना छोटेसे सुनील गावसकर एका मच्छीमाराच्या पत्नीजवळ झोपलेले आढळले. रुग्णालयातील नर्सने चुकून तिथे त्यांना झोपवले. त्यामुळे काकांनी लक्ष दिले नसते, तर आज गावसकर कदाचित मासेमारी करत असते.