IPL 2026 Sunil Narine Surpasses Keiron Pollard: आयपीएल २०२६ हंगामातील दुसरा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मुंबई इंडियन्स (MI) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात खेळवला जाणार आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मुंबईसाठी शार्दुल ठाकूर संघाचा उत्कृष्ट गोलंदाज ठरला, ज्याने ३ विकेट्स घेतल्या आहेत. या सामन्यात केकेआरचा महत्त्वाचा खेळाडू सुनील नरेनने मोठा विक्रम घेतला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सन या सामन्यासाठी, आयपीएलमध्ये उत्कृष्ट कामगिरी असलेला टी-२० खेळाडू सुनील नरेनला आपल्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिलं आहे. प्लेइंग इलेव्हनमधील सुनील नरेनचा समावेश हा आयपीएलमधील एक विदेशी खेळाडू म्हणून त्याच्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.
वेस्ट इंडिजचा माजी खेळाडू सुनील नरेन आयपीएलमध्ये पदार्पण केल्यापासून कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. संघाच्या तीन वेळा ट्रॉफी जिंकण्यातही त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सुनील नरेन खेळायला उतरताच तो आयपीएलमधील सर्वाधिक सामने खेळणारा विदेशी खेळाडू ठरला. यापूर्वी हा मान मिळवलेल्या कायरन पोलार्डला त्याने मागे टाकलं. हा सुनील नरेनचा १९० वा आयपीएल सामना आहे. या यादीत एबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर प्रत्येकी १८४ आयपीएल सामने खेळून तिसऱ्या स्थानावर आहेत.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारे विदेशी खेळाडू
सुनील नरेन – १९० सामने
कायरन पोलार्ड – १८९ सामने
एबी डिव्हिलियर्स – १८४ सामने
डेव्हिड वॉर्नर – १८४ सामने
ड्वेन ब्राव्हो – १६१ सामने
आयपीएलमध्ये सुनील नरेनची फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्हीमध्ये उत्कृष्ट कामगिरी असून, त्याने २५.६३ च्या सरासरीने १९२ बळी घेतले आहेत. या हंगामात २०० बळींचा टप्पा गाठण्याची त्याला मोठी संधी आहे. याशिवाय, फलंदाजीत त्याने १७.६२ च्या सरासरीने १७८० धावा केल्या आहेत.
