गतविजेत्या कोलकाता नाइट रायडर्स संघाला जेतेपद कायम राखण्याच्या दृष्टीने दिलासा मिळाला आहे. त्यांचा प्रमुख गोलंदाज सुनील नरिनला आयपीएलच्या आठव्या हंगामात गोलंदाजी करण्यासाठी मुभा मिळाली आहे. बीसीसीआयच्या गोलंदाजी परीक्षण समितीने नरिनच्या गोलंदाजीची चाचणी घेतली. नरिनची सुधारित शैली नियमानुसार वैध असल्याने समितीने त्याला हिरवा कंदील दिला आहे.
एल. वेंकटराघवन, जवागल श्रीनाथ आणि ए.व्ही. जयप्रकाश यांचा समावेश असलेल्या समितीने नरिनच्या गोलंदाजीच्या शैलीचे परीक्षण केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेद्वारा प्रमाणित चेन्नईस्थित श्री रामचंद्र विद्यापीठाच्या केंद्रात नरिनच्या गोलंदाजीचे बायोमेकॅनिकल (जैविक) परीक्षण झाले. तज्ज्ञांनी दिलेल्या सूचनांनुसार नरिनने आपल्या शैलीत बदल केले.
‘‘नरिनची सुधारित शैली आयसीसीच्या नियमावलीनुसार असल्याने सदोष गोलंदाजीच्या शैली असणाऱ्या खेळाडूंच्या यादीतून त्याचे नाव वगळण्यात आले आहे,’’ असे बीसीसीआयने पत्रकाद्वारे स्पष्ट केले. या निर्णयामुळे नरिन कोलकाता नाइट रायडर्सच्या मुंबई इंडियन्सविरुद्धच्या बुधवारी होणाऱ्या सलामीच्या लढतीसाठी उपलब्ध असेल.
गेल्या वर्षी झालेल्या चॅम्पियन्स लीग ट्वेन्टी-२० स्पर्धेत नरिनच्या गोलंदाजीच्या शैलीविषयी पंचांनी आक्षेप घेतला होता. यानंतर नरिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माघार घेतली होती. गोलंदाजीची शैली निर्दोष नसल्यामुळे नरिनने नुकत्याच झालेल्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतून माघार घेतली होती.