Sunil Narine Creates History in KKR vs SRH: ३७ वर्षीय सुनील नरेनच्या फिरकीच्या जादू अजूनही आयपीएलमध्ये तशीच पाहायला मिळत आहे. सुनील नरेनने कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात विक्रमांची रांग लावली. सुनील नरेनने या सामन्यात २ महत्त्वाच्या विकेट्स घेत हैदराबादला सर्वबाद करण्यात मोलाची भूमिका बजावली. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादचा संघ फक्त १६५ धावांवर १९व्या षटकात सर्वबाद झाला. यासह सुनील नरेनने मोठा इतिहास घडवला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सच्या अनुभवी फिरकीपटूने सनरायझर्स हैदराबादविरूद्ध सामन्यात दुसरी विकेट घेत २०० आयपीएल बळींचा टप्पा गाठला. आयपीएलच्या इतिहासात २०० बळी घेणारा तो पहिला परदेशी गोलंदाज ठरला आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मधल्या फळीतील फलंदाज सलील अरोराला बाद करून त्याने हा पराक्रम केला.
आयपीएलमध्ये २०० बळी घेणारा नरेन आता एकूण तिसरा गोलंदाज ठरला आहे. त्याच्या आधी केवळ युझवेंद्र चहल आणि भुवनेश्वर कुमार या एलिट क्लबचा भाग होते. विशेष म्हणजे, नरेनने २०१२ पासून केवळ कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळताना ही कामगिरी केली असून, तो एकाच संघासाठी २०० बळी घेणारा पहिला गोलंदाजही ठरला आहे.
आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक बळी घेणारे गोलंदाज
युझवेंद्र चहल – २२८
भुवनेश्वर कुमार – २१५
सुनील नरेन – २०१
पियुष चावला – १९२
आर अश्विन – १८७
सुनील नरेनची आयपीएल कारकीर्द उल्लेखनीय राहिली आहे. त्याने १९७ सामन्यांमध्ये २५ पेक्षा जास्त सरासरीने २०० बळी घेतले आहेत. त्याचा सुमारे ६.८ चा इकॉनॉमी रेट, आयपीएलच्या इतिहासात १०० पेक्षा जास्त बळी घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये सर्वोत्तम आहे. तसेच, त्याने आयपीएलमध्ये आठ वेळा चार किंवा अधिक बळी घेतले आहेत, ज्यात एकदा पाच बळी घेण्याचा आणि एका हॅट-ट्रिकचा समावेश आहे.
सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण संघ १९ षटकांत केवळ १६५ धावांवर सर्वबाद झाला. सुरूवातीला संघाची धावसंख्या १०५ धावांवर एक गडी बाद अशी होती. त्यानंतर, पुढच्या ६० धावांत एकामागून ९ विकेट्स संघाने गमावले. वरुण चक्रवर्तीने तीन, तर सुनील नरेन आणि कार्तिक त्यागी यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
वैभव अरोरा, कॅमेरॉन ग्रीन आणि अनुकूल रॉय यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. हैदराबादकडून ट्रॅव्हिस हेडने २८ चेंडूंमध्ये धडाकेबाज ६१ धावा करून सर्वाधिक धावा केल्या, तर इशान किशनने २९ चेंडूंमध्ये ४२ धावा केल्या.
