Sunil Narine Creates History in IPL: कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियममध्ये सामना खेळवला जात आहे. गुजरातचा संघ १६ गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहे तर केकेआरचा संघ प्लेऑफच्या आशा जिवंत ठेवण्यासाठी प्रत्येक सामन्यात लढत आहे. यादरम्यान गुजरातने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत केकेआरला फलंदाजीसाठी पाचारण केलं. यादरम्यान सुनील नरेनने मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
कोलकाता नाईट रायडर्सचा स्टार फिरकी गोलंदाज सुनील नरेनने आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम रचला आहे. त्याने अशी कामगिरी केली आहे, जी यापूर्वी कोणत्याही विदेशी खेळाडूने केलेली नाही. गुजरात टायटन्सविरूद्ध सामन्यात खेळण्यासाठी उतरताच सुनील नरेनने इतिहास घडवला. हा नरेनचा २०० वा आयपीएल सामना आहे आणि २०० आयपीएल सामने खेळणारा तो पहिला विदेशी खेळाडू ठरला आहे. तसेच, २०० सामने खेळणारा तो आयपीएलमधील एकूण १३ वा खेळाडू ठरला आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा खेळाडू विराट कोहली आहे, ज्याने २८० सामने खेळले आहेत. त्याच्यानंतर या यादीत रोहित शर्मा आहे. एम.एस. धोनी २७८ सामन्यांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. रवींद्र जडेजा २६५ सामने खेळून या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. दिनेश कार्तिक २५७ सामन्यांसह आयपीएलमध्ये सर्वाधिक सामने खेळणारा पाचवा खेळाडू आहे.
सुनील नरेनने २०१२ मध्ये कोलकाता नाइट रायडर्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण केलं आणि तेव्हापासून तो या फ्रँचायझीचा अविभाज्य भाग असून, केकेआरला तीन विजेतेपदे जिंकून देण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. सुनील नरेनच्या २०० सामन्यांनंतर १८९ सामने खेळलेला कायरन पोलार्ड दुसऱ्या क्रमांकावर आहे. एबी डिव्हिलियर्स आणि डेव्हिड वॉर्नर यांनी प्रत्येकी १८४ सामने खेळले आहेत.
आयपीएलमध्ये २०० किंवा त्याहून अधिक बळी घेणारा सुनील नरेन हा एकमेव विदेशी गोलंदाज आहे. विदेशी गोलंदाजांच्या बळी घेणाऱ्यांच्या यादीत त्याच्या खालोखाल ड्वेन ब्राव्हो (१८३ बळी) आणि रशीद खान (१७४ बळी) यांचा क्रमांक लागतो. त्याने एकदा पाच बळी आणि सात वेळा चार बळी घेतले आहेत. फलंदाजीमध्ये, त्याने १२६ डावांत १७.५० च्या सरासरीने १,८२० धावा केल्या आहेत, ज्यात एका शतकाचा आणि सात अर्धशतकांचा समावेश आहे.
