कितीही धावा केल्या तरी पुरणार नाहीत याचा प्रत्यय घडवत सनरायझर्स हैदराबादने वानखेडे मैदानावर अडीचशे पार धावसंख्येचा यशस्वी पाठलाग केला. मुंबईने २४३ धावांचा डोंगर उभारला तेव्हा तो पुरेसा ठरेल अशी चिन्हं होती मात्र हैदराबादच्या एकापेक्षा एक फटकेबाजांनी हे लक्ष्यही किरकोळ ठरवलं. हैदराबादने १८.४ षटकात ६ विकेट्स राखून संस्मरणीय विजय मिळवला. या पराभवामुळे गुणतालिकेत मुंबईच्या संघाची आणखी घसरण झाली असून, प्लेऑफ्सच्या आशा मावळत चालल्या आहेत. हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह यांचं अपयश मुंबईसाठी चिंतेचा विषय ठरला आहे. दुसरीकडे हिटमॅन रोहित शर्मा दुखापतीतून सावरण्याची प्रतीक्षा याही सामन्यात कायम राहिली.
डोंगराएवढ्या लक्ष्याचा पाठलाग करताना ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांनी मुंबईच्या गोलंदाजीच्या ठिकऱ्या उडवल्या. मैदानाच्या कानाकोपऱ्यात चौकार-षटकार चोपून काढत हेड-अभिषेकने इरादे स्पष्ट केले. सातव्या ओव्हरमध्येच त्यांनी संघाचं शतक फलकावर नोंदवलं. जगातला नंबर एकचा गोलंदाज जसप्रीत बुमराहलाही या जोडीने सोडलं नाही. युवा अश्वनी कुमारच्या पहिल्याच ओव्हरमध्ये या दोघांनी २३ धावा कुटल्या. अफगाणिस्तानचा शिलेदार गनफझरने अभिषेक शर्माला बाद करत झंझावात रोखला. अभिषेकने २४ चेंडूत ४५ धावांची वेगवान खेळी केली. यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. दवामुळे दोनदा चेंडू गनफझरच्या हातातून निसटला. तिसऱ्या खेपेस इशान किशन त्रिफळाचीत होऊन तंबूत परतला. त्याला भोपळाही फोडता आला नाही. हेनरिच क्लासनने गनफझरची हॅट्टिक होऊ दिली नाही.
हार्दिक पंड्याने हेडला बाद करत हैदराबादला वेसण घातली. हेडने ३० चेंडूत ४ चौकार आणि ८ षटकारांसह ७६ धावांची वादळी खेळी केली. ऑफस्टंपबाहेरच्या चेंडूवर मोठा फटका मारायचा हेडचा प्रयत्न विल जॅक्सच्या हातात जाऊन विसावला. क्लासन-नितीश जोडीने अश्वनीच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये १८ धावा लुटल्या. जसप्रीत बुमराहच्या षटकात १३ धावा लुटत हैदराबादने चमत्कार घडवण्यासाठी सज्ज असल्याचं दाखवून दिलं. हेड आणि अभिषेकने दिलेल्या पायावर हेनरिच क्लासनने कळस चढवला. सातत्याने चौकार वसूल करत क्लासनने मुंबईच्या आक्रमणातली हवा काढून टाकली. क्लासन-नितीश जोडीने ४० चेंडूत ८० धावांची वादळी भागीदारी केली. क्लासनने ३० चेंडूत ६५ धावांची तडाखेबंद खेळी केली. या खेळीत ७ चौकार आणि ४ षटकारांची लयलूट केली. नितीश बाद झाल्यानंतर सलील अरोराने क्लासनला चांगली साथ दिली. सलीलने १० चेंडूत ३० धावांची उपयुक्त खेळी केली.
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने प्रथम फलंदाजीचा धाडसी निर्णय घेतला. वानखेडेचं मैदान छोटं आहे. दुसऱ्या डावात धावांचा पाठलाग होतो. दव पडलं तर गोलंदाजी करणं कठीण होतं. यामुळे टॉस जिंकून कर्णधार गोलंदाजी स्वीकारतात. पण हार्दिकने परंपरेला छेद देत फलंदाजीचा करणार असल्याचं सांगितलं. मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीतून अजूनही पूर्णपणे न सावरल्याने हिटमॅन रोहित शर्मा या सामन्यातही खेळणार नसल्याचं स्पष्ट झालं. अनुभवी विकेटकीपर बॅट्समन क्विंटन डी कॉक मनगटाला झालेल्या दुखापतीमुळे खेळू शकला नाही. मुंबईने या दोघांऐवजी रायन रिकलटन आणि रॉबिन मिन्झ यांना संधी दिली.
रिकलटनची शतकी खेळी व्यर्थ
रिकलटनच्या बरोबरीने विल जॅक्स सलामीला आला. या जोडीने ७.१ ओव्हर्समध्ये ९३ धावांची खणखणीत सलामी दिली. हैदराबादच्या प्रत्येक गोलंदाजांचा समाचार घेत रिकलटन-हेड जोडीने फटकेबाजी केली. रिकलटनने लेगसाईडवर लक्ष केंद्रित करत चौकार-षटकारांची लयलूट केली. नितीश कुमार रेड्डीने जॅक्सचा अडथळा दूर केला. त्याने २२ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ४६ धावांची खेळी केली. भारतीय टी२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याही सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. इशान मलिंगाने त्याला बाद केलं. तो ५ धावाच करू शकला. नमन धीरने १७ चेंडूत २२ धावांची खेळी करत रिकलटनला चांगली साथ दिली. प्रफुल हिंगने नमनची खेळी संपुष्टात आणली. स्पर्धेत धावांसाठी झगडणाऱ्या हार्दिकने १५ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह ३१ धावांची खेळी केली. एका बाजूने सहकारी बाद होत असतानाही रिकलटनची एकाग्रता भंगली नाही. प्रचंड उकाडा आणि आर्द्रता अशा वातावरणात संपूर्ण २० ओव्हर्स बॅटिंग करत रिकलटनने १० चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद १२३ धावांची मॅरेथॉन खेळी साकारली. मुंबई इंडियन्सतर्फे ही सर्वोच्च वैयक्तिक धावसंख्या आहे. रिकलटनने अवघ्या ४४ चेंडूत शतक पूर्ण केलं. मुंबई संघासाठी हे सगळ्यात वेगवान शतक आहे. मुंबईने २४३ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादतर्फे हिंगेने २ विकेट्स पटकावल्या.
रायन रिकल्टनच्या शतकामुळे, मुंबई इंडियन्स आता सनरायझर्स हैदराबादनंतर आयपीएलमधील असा दुसरा संघ ठरला आहे, ज्याच्या तीन किंवा अधिक वेगवेगळ्या फलंदाजांनी एकाच हंगामात शतकं झळकावली आहेत. यापूर्वी २०२५ च्या आयपीएल हंगामात, सनरायझर्स हैदराबादसाठी अभिषेक शर्मा, इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांनी शतकं झळकावली होती. तर, रिकल्टनच्या आधी, या हंगामात मुंबई इंडियन्सकडून क्विंटन डी कॉक आणि तिलक वर्मा यांनी शतकं झळकावली होती.
