SRH vs PBKS Record: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४९ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पहिल्या डावात फलंदाजी करताना ४ गडी बाद २३५ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला २०२ धावांपर्यंत मजल मारता आली. यासह हैदराबादने हा सामना ३३ धावांनी आपल्या नावावर केला. दरम्यान पहिल्या डावात २३५ धावांचा डोंगर उभारताच हैदराबादच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे.
हैदराबादचा संघ मोठी धावसंख्या उभारण्यासाठी ओळखला जातो. आयपीएलमध्ये ३०० धावांचा पल्ला कोणता संघ गाठणार? तर हैदराबादचं नाव नेहमीच पुढे असतं. हा संघ या आव्हानाच्या जवळपास पोहोचला आहे. पण ३०० धावांपर्यंत पोहोचू शकलेला नाही. दरम्यान २३५ धावा करताच हैदराबादचा संघ हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस २२५ धावांचा डोंगर उभारणारा संघ ठरला आहे.
हैदराबादने आतापर्यंत १४ वेळेस २२५ धावांचा पल्ला गाठला आहे. तर या यादीत दुसऱ्या स्थानी असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने १० वेळेस २२५ पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या पंजाब किंग्ज संघाने देखील १० वेळेस २२५ पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. यासह टी -२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक वेळेस २२५ धावांपेक्षा अधिक धावा करणाऱ्या संघांच्या यादीत भारतीय संघ अव्वल स्थानी आहे. भारतीय संघाने १८ वेळेस हा कारनामा केला आहे. आता दुसऱ्या स्थानी हैदराबादचा संघ पोहोचला आहे. या रेकॉर्डमध्ये हैदराबादने समरसेट संघाची बरोबरी केली आहे. समरसेटने देखील १४ वेळेस २२५ हून अधिक धावा केल्या आहेत.
हैदराबादचा विजय
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आला होता. प्रथम फलंदाजी करताना अभिषेक शर्माने ३५ धावांची खेळी केली. तर ट्रॅव्हिस हेडने ३८, इशान किशनने ५५ धावांची खेळी केली. तर हेनरिक क्लासेनने ६९ आणि नितीश कुमार रेड्डीने नाबाद २९ धावांची खेळी करून हैदराबादची धावसंख्या ४ गडी बाद २३५ धावांवर पोहोचवली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी पंजाबकडून कुपर कॉनोलीने नाबाद १०७ धावांची खेळी केली. पंजाबने हा सामना ३३ धावांनी गमावला.
