Sunrisers Hyderabad Record: सनरायझर्स हैदराबादचा संघ आयपीएल स्पर्धेत मोठी धावसंख्या उभारण्यासाठी ओळखला जातो. एकापेक्षा एक स्फोटक फलंदाजांची फौज असलेल्या सनरायझर्स हैदराबादला आयपीएल स्पर्धेत ३०० धावांचा डोंगर उभारण्यासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. हा संघ ३०० धावांच्या जवळपास पोहोचला आहे. पण ३०० धावांचा पल्ला गाठू शकलेला नाही. पण २०० हून अधिक धावा करण्यात हैदराबादचा हातखंडा आहे. पंजाब किंग्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना २३५ धावांचा डोंगर उभारला. यासह हैदराबादच्या नावे आयपीएल स्पर्धेतील मोठा रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इशान किशन आणि हेनरिक क्लासेन यांच्या दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर हैदराबादने २० षटकांअखेर ४ गडी बाद २३५ धावांचा डोंगर उभारला. हैदराबादने पंजाब किंग्सविरुद्ध खेळताना आतापर्यंत ८ वेळेस २०० पेक्षा अधिक धावांचा डोंगर उभारला आहे. यासह मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना ८ वेळेस २०० हून अधिक धावा केल्या आहेत. यासह भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळताना ८ वेळा २०० हून अधिक धावांचा डोंगर उभारला आहे.

टी -२० क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक वेळेस २०० पेक्षा अधिक धावा करणारे संघ

भारत विरुद्ध न्यूझीलंड – ८ वेळा

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका – ८ वेळा

मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स – ८ वेळेस

दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत – ८ वेळेस

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध पंजाब किंग्स – ८ वेळेस

मुख्य बाब म्हणजे सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्स हे दोन्ही संघ केवळ ११ वेळेस आमनेसामने आले आहेत. इतके कमी सामने खेळून सुध्दा हैदराबादने पंजाबविरुद्ध ८ वेळेस २०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. त्यामुळे फलंदाजीच्या बाबतीत हैदराबादचा संघ हा सर्वात यशस्वी संघ आहे. इतर कुठल्याही संघाला इतके कमी सामने खेळून २०० पेक्षा अधिक धावा करता आलेल्या नाहीत.

या सामन्यात हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने २३५ धावांपर्यंत मजल मारली. हैदराबादकडून हेनरिक क्लासेन आणि इशान किशन यांनी अर्धशतकं झळकावली. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबकडून कुपर कॉनोलीने शतकी खेळी केली. पण पंजाबचा संघ विजयापासून ३३ धावा दूर राहिला.