मुंबई इंडियन्सकडून हार पत्करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादसमोर बुधवारी दुसऱ्या स्थानावरील किंग्ज इलेव्हन पंजाबचे अवघड आव्हान उभे ठाकले आहे. मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब यांच्याकडून पत्करलेले पराभव वगळल्यास किंग्ज इलेव्हन पंजाबने आयपीएलच्या सातव्या मोसमावर आपली एक महत्त्वाकांक्षी छाप पाडली आहे. परंतु या धक्क्यातून सावरत पंजाबचा संघ पुन्हा विजयी अभियानासह ‘प्ले-ऑफ’मधील आपले स्थान निश्चित करू शकेल.
ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलर हे पंजाबचे फलंदाजीतील तारे प्रतिस्पर्धी गोलंदाजांवर दिमाखात हल्ले करीत आहेत. जुना-जाणता वीरेंद्र सेहवागसुद्धा आपल्या कुवतीनुसार धावांचे योगदान देत आहे. फलंदाजीप्रमाणेच पंजाबची गोलंदाजीसुद्धा मजबूत आहे. युवा वेगवान गोलंदाज संदीप शर्माच्या खात्यावर १३ बळी जमा आहेत. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल जॉन्सनचा अनुभव संघाला फायदेशीर पडत आहे.
गतवर्षी सनरायजर्सकडून खेळणाऱ्या थिसारा परेराच्या समावेशामुळे पंजाबचा संघ आणखी मजबूत झाला आहे. याचप्रमाणे चेतेश्वर पुजारा, शॉन मार्श, मुरली कार्तिक आणि लक्ष्मीपती बालाजी यांच्यासारखे संघाच्या गरजा समर्थपणे भागवत आहेत.
दुसरीकडे सोमवारी मुंबई इंडियन्सकडून पराभव पत्करणाऱ्या सनरायजर्स हैदराबादची घरच्या मैदानावरील आकडेवारी चांगली आहे. आरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर, कर्णधार शिखर धवन आणि डॅरेन सॅमी यांच्यासारखे दिग्गज फलंदाज हैदराबादच्या संघात आहेत. याचप्रमाणे त्यांच्या गोलंदाजीची मदार आहे ती दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनवर. त्याच्या साथीला भुवनेश्वर कुमार, मोझेस हेन्रिक्स आणि इरफान पठाण यांच्यासारखे गुणी वेगवान गोलंदाज आहेत.