पाकिस्तानच्या खेळाडूला संघात घेतल्याप्रकरणी सनरायझर्स हैदराबाद आणि मालक काव्या मारन यांना प्रचंड टीकेला सामोरं जावं लागत आहे. इंग्लंडमध्ये दरवर्षी आयोजित होणाऱ्या द हंड्रेड स्पर्धेसाठी खेळाडूंचा लिलाव पार पडला. हंड्रेड स्पर्धेत सनरायझर्स हैदराबादच्या संघमालकांचा संघ आहे. या लिलावात मालक काव्या मारन यांच्यासह सनरायझर्स हैदराबादची कोअर टीम उपस्थित होती. लिलावात पाकिस्तानचा खेळाडू अबरार अहमदचं नाव आलं. हैदराबादने संघाने अबरारला ताफ्यात घेण्यासाठी उत्सुकता दाखवली. ट्रेंट रॉकेट्स संघही अबरारसाठी उत्सुक होता. शर्यतीत सनरायझर्स हैदराबाद संघाने बाजी मारली. २.३४ कोटी रुपये मोजून सनरायझर्स हैदराबाद संघाने अबरारला संघात समाविष्ट केलं.
२००८ मध्ये झालेल्या आयपीएलच्या पहिल्यावहिल्या हंगामात पाकिस्तानचे ११ खेळाडू सहभागी झाले होते. मात्र त्याचवर्षी नोव्हेंबर महिन्यात मुंबईवर भीषण दहशतवादी हल्ला झाला. हल्ल्याची सूत्रं पाकिस्तानात असल्याचं स्पष्ट झालं. यामुळे त्यानंतर पाकिस्तानच्या खेळाडूंचा आयपीएल खेळण्याचा मार्ग बंद झाला. २००६ मध्ये भारतीय संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर गेला होता. २०१३ मध्ये पाकिस्तानचा संघ भारतात मालिका खेळण्यासाठी आला होता. भारतीय संघ २०२५ मध्ये पाकिस्तानात झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे सामने खेळण्यासाठी गेला नाही. भारताचे सामने तटस्थ ठिकाणी म्हणजे युएईत खेळवण्यात आले. आयसीसी आणि आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान लढती तटस्थ ठिकाणी खेळवण्यात येतात. भारतीय संघ पाकिस्तानात जात नाही आणि पाकिस्तानचा संघ भारतात येत नाही.
काही महिन्यांपूर्वी आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ विजयी ठरला होता. आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक घेण्यास भारतीय संघाने नकार दिला. नक्वीही आपणच करंडक देणार या भूमिकेवर ठाम राहिले. अखेर भारतीय संघ करंडकाविनाच मायदेशी परतला. अद्यापही हा करंडक भारतीय संघाला मिळालेला नाही. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध आणखीनच दुरावले. या पार्श्वभूमीवर आयपीएल स्पर्धेतील सनरायझर्स हैदराबाद संघाने पाकिस्तानच्या खेळाडूला संघात घेतल्याने वादाला तोंड फुटले आहे.
नुकत्याच झालेल्या टी२० वर्ल्डकप स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाने भारताविरुद्धच्या लढतीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आर्थिक नुकसानाची कल्पना दिल्यानंतर तसंच आयसीसीच्या मध्यस्थीनंतर पाकिस्तानने हा सामना खेळला. पाकिस्तानचे सगळे सामने श्रीलंकेत झाले.
बांगलादेशात हिंदू नागरिकांवर होणाऱ्या अत्याचाराच्या पार्श्वभूमीवर देशभरात आंदोलनं झाली. याचा परिणाम म्हणजे बीसीसीआयने कोलकाता नाईट रायडर्स संघातील बांगलादेशचा खेळाडू मुस्ताफिझूर रहमानला रिलीज करण्याचा आदेश दिला. कोलकाता संघाने बीसीसीआयच्या आदेशाचं पालन करत मुस्ताफिझूरला रिलीज केलं. मुस्ताफिझूरच्या ऐवजी कोलकाताला बदली खेळाडू घेता येईल. हे आयपीएल स्पर्धेसंदर्भात घडलं होतं.
द हंड्रेड ही इंग्लंड क्रिकेट बोर्डातर्फे आयोजित स्पर्धा आहे. या स्पर्धेतील काही संघ आयपीएलमधील संघमालकच आहेत. इंग्लंड बोर्डाला पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंच्या सहभागाविषयी काहीही आक्षेप नाही त्यामुळेच द हंड्रेड स्पर्धेच्या लिलावात पाकिस्तानच्या खेळाडूंचा समावेश होता.
सनरायझर्स हैदराबाद संघावर चाहत्यांनी बहिष्कार टाकावा असं आवाहन काही नेटिझन्सनी केलं आहे. अबरारला संघात घेण्याची काय आवश्यकता? फिरकीपटूंची एवढी टंचाई होती का असा सवाल काहींनी केला आहे. २७वर्षीय अबरारने १० टेस्ट, १५ वनडे आणि ३८ टी२० सामन्यात पाकिस्तानचं प्रतिनिधित्व केलं आहे. तो पाकिस्तान सुपर लीगसह अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट, बांगलादेश प्रीमिअर लीग या स्पर्धेत खेळतो. यंदा द हंड्रेड स्पर्धेत त्याचं पदार्पण होईल.
