आयपीएल २०२१मध्ये २५ सप्टेंबरचा शनिवारचा दिवस फलंदाजांसाठी वाईट स्वप्नासारखा ठरला. आजच्या पहिल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळताना पहिल्या पॉवरप्लेमध्ये २१ धावा केल्या. यंदाच्या हंगामातील हा पॉवरप्लेमधील सर्वात कमी धावसंख्येचा विक्रम होता. आता दुसऱ्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादने पंजाब किंग्जविरुद्ध खेळताना राजस्थानचा विक्रम मोडला. हैदराबादने पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये २ बाद २० धावा केल्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आयपीएलच्या इतिहासात पॉवरप्लेमधील ही त्यांची सर्वात नीचांकी धावसंख्या ठरली.

हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. गोलंदाजांनी केलेल्या प्रभावी कामगिरीमुळे त्यांनी पंजाबला २० षटकात ७ बाद १२५ धावांवर रोखले. प्रत्युत्तरात हैदराबादची सुरुवातही खराब झाली. पंजाबचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने डेव्हिड वॉर्नर आणि केन विल्यमसनला बाद करत चांगला दणका दिला. दबावात खेळताना हैदराबादला धावा जोडता आल्या नाही आणि त्यांना पहिल्या पॉवरप्लेमध्ये २० धावांपर्यंतच मजल मारता आली.

हेही वाचा – VIDEO : याला म्हणतात अफलातून कॅच! बदली खेळाडू म्हणून ‘तो’ मैदानात आला, अन् त्यानं…

आयपीएल २०२१मध्ये पॉवरप्लेमध्ये सर्वात कमी धावा

२०/२ हैदराबाद वि. पंजाब, शारजाह

२१/३ राजस्थान वि. दिल्ली, अबुधाबी

२१/१ मुंबई वि. पंजाब, चेन्नई

२४/४ चेन्नई वि. मुंबई, दुबई

२५/१ कोलकाता वि. राजस्थान, मुंबई