डावखुरा वेगवान गोलंदाज टी. नटराजनची आयपीएलच्या येत्या हंगामात सनरायझर्स हैदराबादकडे घरवापसी होणार आहे. सनरायझर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात ट्रेडऑफ व्यवहार झाला. यानुसार नटराजन सनरायझर्स हैदराबादकडे परतला आहे. या बदल्यात हैदराबादने फिरकीपटू झीशान अन्सारीला दिल्लीला सोपवलं आहे.
लिलावात दिल्ली कॅपिटल्स संघाने तब्बल १० कोटी रुपये मोजून नटराजनला ताफ्यात दाखल करून घेतलं होतं. मात्र दुखापतीमुळे नटराजनच्या गुणकौशल्यांचा दिल्लीला फारसा उपयोग करून घेता आला नाही. घरवापसी करण्याचं सुख त्याच्या नशिबी आहे पण त्यासाठी त्याला त्यासाठी आर्थिक नुकसान सोसावं लागणार आहे. सनरायझर्स हैदराबाद नटराजनला ५ कोटी रुपये मानधन देणार आहे. नटराजनच्या वेतनात तब्बल ५ कोटी रुपयांची घट झाली आहे.
नटराजनने २०२० ते २०२४ या कालावधीत सनरायझर्स हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं होतं. २०२४ हंगामात नटराजनने १९ विकेट्स पटकावल्या होत्या. हैदराबादने त्या हंगामात फायनलपर्यंत धडक मारली होती. त्यात नटराजनचा महत्त्वाचा वाटा होता.
गेल्या वर्षी झीशानने १० सामन्यात हैदराबादचं प्रतिनिधित्व केलं. पदार्पणात दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध त्याने ३ विकेट्स पटकावल्या होत्या. १० सामन्यात झीशानने ६ विकेट्स घेतल्या आहेत. अन्सारीच्या मानधनात कोणताही बदल होणार नाहीये. दिल्ली कॅपिटल्स संघव्यवस्थापनाकडून त्याला ४० लाख रुपये मिळणार आहेत.
