Sunrisers Hyderabad vs Lucknow Super Giants: आयपीएल २०२६ स्पर्धेतील १० वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात गोलंदाजांचा बोलबाला पाहायला मिळाला. पहिल्या डावात हैदराबादच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी केली आणि हैदराबादला १५६ धावांवर रोखलं. या धावांचा पाठलाग करताना हैदराबादच्या गोलंदाजांनी पूर्ण जोर लावला. पण ऋषभ पंतने अर्धशतकी खेळी करून लखनौ सुपर जायंट्स संघाला या हंगामातील पहिला विजय मिळवून दिला.
या सामन्यातील पहिल्या डावात फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाने १५६ धावा केल्या होत्या. १५७ धावांचा पाठलाग करताना सलामीला आलेला मिचेल मार्श अवघ्या १४ धावा करून माघारी परतला. तर एडन मारक्रमने एक बाजू धरून ठेवली. त्याने २७ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांचा साहाय्याने ४५ धावांची खेळी केली. त्याचं अर्धशतक थोडक्यात हुकलं. इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजीला आलेला आयुष बदोनी १२ धावा करून माघारी परतला. तर निकोलस पूरन १ धाव करून माघारी परतला. अब्दुल समदने १२ चेंडूत १६ धावांचे योगदान दिले. तर कर्णधार ऋषभ पंत शेवटपर्यंत उभा राहिला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला.
हैदराबादने केल्या १५६ धावा
या सामन्यात लखनौ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबादला सुरुवातीला मोठे धक्के बसले. ट्रॅव्हिस हेड अवघ्या ७ धावांवर माघारी परतला. तर अभिषेक शर्माला खातेही उघडता आले नाही. कर्णधार इशान किशन १ धाव करून माघारी परतला. लियाम लिव्हिंगस्टनने २० चेंडूत १४ धावा केल्या. सुरुवातीलाच ४ मोठे धक्के बसल्यानंतर हेनरिक क्लासेन आणि नितीश कुमार रेड्डीने महत्वपूर्ण भागीदारी करून संघाचा डाव सांभाळला. हेनरिक क्लासेनने ४१ चेंडूत ६२ धावांची महत्वपूर्ण खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने ५ चौकार आणि २ षटकार खेचले. तर नितीश कुमार रेड्डीने ३३ चेंडूत ५६ धावा करत लागोपाठ दुसरं अर्धशतक झळकावलं. यादरम्यान त्याने ३ चौकार आणि ५ षटकार खेचले. सनरायझर्स हैदराबादने ९ गडी बाद १५६ धावा केल्या.
संजीव गोयंकांच्या डोळ्यात पाणी
ऋषभ पंतने २ चेंडूत एका धावेची गरज असताना चौकार मारला आणि आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दरम्यान चौकार मारल्यानंर लखनौ या हंगामातील आपला पहिला विजय मिळवला. या विजयानंतर स्टँड्समध्ये असलेल्या संजीव गोयंकांच्या डोळ्यात पाणी आलं.
