आयपीएलच्या अंतिम फेरीत २०८ धावांचा डोंगर सनरायझर्स हैदराबादने उभारला खरा, पण ख्रिस गेलची धडाकेबाज फलंदाजी पाहताना हा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ जिंकेल, असे साऱ्यांनाच वाटत होते. गेल बाद झाल्यावर मात्र सामन्याचा नूर पालटला आणि हैदराबादने जेतेपदाला गवसणी घातली. याबाबत हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नर म्हणाला की, ‘आम्ही २०८ धावा उभारू, असे मला वाटले नव्हते. कारण या खेळपट्टीवर १८० धावांचे आव्हान चांगले ठरले असते. पण आम्ही दोनशे धावांचा डोंगर उभारल्यावरही गेलच्या तडाखेबंद फलंदाजीमुळे हा सामना निसटतो आहे का, असा प्रश्न काही जणांना पडला असेलही. पण त्यावेळी मी हताश झालो नाही. डोके शांत ठेवून गोलंदाजांना मार्गदर्शन करत होतो, त्यामुळेच सामना जिंकू शकलो. हे जेतेपद अविस्मरणीय असेच आहे.’

अंतिम सामन्यात गेलची फलंदाजी सामन्याचा नूर पालटणारी होती. पण अन्य फलंदाजांना लौकिाकाला साजेसा खेळ करता न आल्यामुळेच बंगळुरुला हा सामना गमवावा लागला. गेलच्या फलंदाजीबाबत वॉर्नर म्हणाला की, ‘गेल हा एक दर्जेदार फलंदाज आहे, एकहाती सामना फिरवण्याची धमक त्याच्यामध्ये आहे. तो ज्या पद्धतीने आमच्या गोलंदाजीचा समाचार घेत होता ते पाहता हा सामना बंगळुरी जिंकेल, असे काही जणांना वाटत होते. पण त्यावेळी मी गोलंदाजांशी संवाद साधत होतो. त्यांना संथगतीचे चेंडू टाकण्याबद्दल सांगत होतो. पण तरीही गेल जोरकस फटके लगावत होता. पण जर तो बाद झाला तर फलंदाजीला आलेल्या नवीन फलंदाजाला मोठे फटके मारणे सोपे नव्हते. त्यामुळे गेल बाद झाल्यावर आम्ही सुटकेचा निश्वास टाकला, पण त्यावेळी आम्ही गाफील मात्र नक्कीच नव्हतो. कारण ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये अखेरच्या चेंडूपर्यंत काहीही होऊ शकते. त्यामुळे प्रत्येक चेंडू आमच्यासाठी महत्त्वाचा होता.’

वॉर्नरमुळेच युवा खेळाडू प्रभावित – लक्ष्मण

सनरायझर्स हैदराबादच्या विजयाचे श्रेय मार्गदर्शक व्ही.व्ही.एस. लक्ष्मणने कर्णधार डेव्हिड वॉर्नरला दिले आहे. वॉर्नरने ज्यापद्धतीने संघ बांधला ते फार महत्त्वाचे आहे. वॉर्नरच्या फलंदाजीबरोबर नेतृत्वातील कौशल्यामुळे संघातील युवा खेळाडू प्रभवित झाले आणि त्यामुळेच आम्हाला जेतेपद पटकावता आले, असे मत लक्ष्मणने व्यक्त केले आहे.

‘ माझ्या मते वॉर्नरने कर्णधार कसा असावा, याचे उत्तम उदाहरण दाखवून दिले आहे. वॉर्नर हा संघासाठी आदर्शवत असा कर्णधार आहे. त्याच्यामध्ये सकारात्मकता आणि आक्रमकपणा आहे. त्याच्या या वृत्तीमुळे खेळाडू त्याच्याकडे आकर्षित झाले आणि संघाला चांगली कामगिरी करता आली,’ असे लक्ष्मण म्हणाला.

तो पुढे म्हणाला की, ‘ वॉर्नरचा प्रत्येक खेळाडूवर विश्वास होता आणि प्रत्येक खेळाडू त्याच्याकडून प्रभावित झाले होते. माझ्या मते तो गोलंदाजांचा कर्णधार आहे. कारण तो गोलंदाजांना अधिक स्वातंत्र्य देतो. जेव्हा गोलंदाजांकडून चांगली कामगिरी होत नाही तेव्हा तो त्यांच्या पाठीशी उभा राहून त्यांना आपला अनुभव सांगतो. त्याच्याकडे कर्णधारपदाचा जास्त अनुभव नसला तरी त्याने उत्तमपणे संघाचे नेतृत्व केले आणि संघाला सर्वोत्तम बनवण्यात सिंहाचा वाटा उचलला.’

अद्भुत नेतृत्व –  मूडी

‘डेव्हिड वॉर्नरचे अद्भुत नेतृत्व पाहण्याचा योग यावेळी आला. त्याने संघाला एका कुटुंबाप्रमाणे मोठे केले. या हंगामाच्या सुरुवातीला युवराज सिंग संघात नव्हता, तर काही सामन्यांमध्ये आशीष नेहराही संघाबाहेर होता. हे दोन्ही अनुभवी खेळाडू दुखापतीमुळे खेळत नसले तरी त्याचे दडपण वॉर्नरने घेतले नाही. त्याने अप्रतिमपणे संघाची बांधणी केली. खेळाडूंना विश्वास दिला,’ असे हैदराबाचे प्रशिक्षक टॉम मूडी यांनी सांगितले.

मूडी पुढे म्हणाले की, ‘वॉर्नर हा जगातील सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक आहे. वॉर्नर शिस्तप्रिय आहे आणि त्याला या गोष्टीचा फायदा संघाचे नेतृत्व करतानाही झाला.’