Australia T20 World Cup 2026 Super 8 Qualification scenario: टी -२० वर्ल्डकप २०२६ मोठे उलटफेर पाहायला मिळणार हे भाकित आधीपासूनच करण्यात आलं होतं. पण झिम्बाब्वेचा संघ ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला ऑलआऊट करून पराभूत करणार, हे सत्य पचवणं कठीण आहे. पण हे सत्य आहे. गोलंदाजी, फलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही क्षेत्रात झिम्बाब्वेचा संघ ऑस्ट्रेलियासाहून एक पाऊल पुढे राहिला. सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या झिम्बाब्वेच्या फलंदाजांनी दमदार फलंदाजी केली आणि १६९ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी १७० धावा करायच्या होत्या. पण ऑस्ट्रेलियाचा डाव १९.३ षटकात १४६ धावांवर आटोपला. हा सामना ऑस्ट्रेलियाने २३ धावांनी गमावला. ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे आणि झिम्बाब्वेच्या सलग २ विजयांमुळे आता पॉइंट्स टेबलमध्ये मोठी उलथापालथ झाली आहे.

झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाला पराभूत करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधीही २००७ मध्ये झालेल्या टी – २० वर्ल्डकपमध्ये झिम्बाब्वेने ऑस्ट्रेलियाला हरवलं होतं. ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या ग्रुप बी मध्ये आहे. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलियासह झिम्बाब्वे, आयर्लंड, श्रीलंका आणि ओमानचा संघ देखील आहे. या गटात प्रत्येक संघाचे २-२ सामने झाले आहेत. श्रीलंकेचा संघ २ पैकी दोन्ही सामने जिंकून ४ गुणांसह अव्वल स्थानी आहे. तर झिम्बाब्वेने देखील २ सामने जिंकले असून ४ गुणांसह हा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाला २ पैकी एक सामना जिंकता आला आहे.

या गटात ओमान आणि आयर्लंड हे दोन्ही संघ आपल्या पहिल्या विजयाच्या प्रयत्नात आहेत. त्यामुळे हे दोन्ही संघ पूर्ण जोर लावू शकतात. तर ऑस्ट्रेलियाला जर सुपर ८ मध्ये प्रवेश करायचा असेल, तर हे दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागणार आहेत. यासह श्रीलंका आणि झिम्बाब्वेच्या पराभवासाठी प्रार्थना देखील करावी लागणार आहे.मुख्य बाब म्हणजे, ऑस्ट्रेलिया आणि झिम्बाब्वे हे दोन्ही संघ टी -२० वर्ल्डकपमध्ये दुसऱ्यांदाच समोरासमोर आले होते. हे दोन्ही सामने झिम्बाब्वेने जिंकले आहेत. आता २०२३ वनडे वर्ल्डकप प्रमाणेच ऑस्ट्रेलियाचा संघ या स्पर्धेतही पुनरागमन करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.