Pakistan Super 8 Qualification Scenario: कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये पार पडलेल्या सामन्यात भारतीय संघाने पाकिस्तानवर एकतर्फी विजयाची नोंद केली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाने १७५ धावा केल्या होत्या. पाकिस्तानला हा सामना जिंकण्यासाठी १७६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. पाकिस्तानचा संपूर्ण डाव अवघ्या ११४ धावांवर आटोपला. यासह पाकिस्तानने हा सामना ६१ धावांच्या मोठ्या फरकाने गमावला. हा सामना जिंकून भारतीय संघाने सुपर ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. तर सामना गमावलेल्या पाकिस्तानचं टेन्शन वाढलं आहे. दरम्यान सुपर ८ मध्ये प्रवेश करण्यासाठी पाकिस्तानसाठी कसं असेल समीकरण? समजून घ्या.
टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानचा समावेश ग्रुप ए मध्ये करण्यात आला आहे. ग्रुप ए मधून नामिबियाचा संघ स्पर्धेतून बाहेर पडला आहे. नामिबियाला स्पर्धेतील तिन्ही सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर भारतीय संघाने स्पर्धेतील तिन्ही सामने जिंकून सुपर ८ मध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. पाकिस्तानने ३ पैकी २ सामने जिंकले आहेत. पाकिस्तानने आतापर्यंत ४ गुणांची कमाई केली आहे. तर अमेरिकेने ४ पैकी २ सामने जिंकले आहेत. पण अमेरिकेचा नेट रन रेट हा पाकिस्तानपेक्षा चांगला आहे.पाकिस्तानला हरवून भारतीय संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं गाठलं आहे. यासह स्पर्धेतील सुपर ८ फेरीत प्रवेश करणारा दुसरा संघ ठरला आहे. याआधी वेस्ट इंडिजने सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित केलं आहे.
अमेरिकेचा संघ ग्रुप ए मध्ये दुसऱ्या स्थानी आहे. तर लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानचा संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी घसरला आहे. तर २ गुणांसह नेदरलँड्सचा संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी आहे आणि नामिबियाचा संघ पाचव्या स्थानी आहे.
पाकिस्तानला सुपर ८ मध्ये स्थान मिळवण्यासाठी काय करावं लागेल?
पाकिस्तानला जर सुपर ८ फेरीत आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर १८ फेब्रुवारीला नामिबियाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात विजय मिळवणं गरजेचं असणार आहे. पण जर हा सामना गमावला, तर अमेरिकेचा संघ सुपर ८ मध्ये प्रवेश करेल. कारण अमेरिकेचा नेट रनरेट हा पाकिस्तानहून चांगला आहे. हा सामना जिंकूनही नामिबियाचा संघ अंतिम फेरीत प्रवेश करू शकणार नाही. नेदरलँड्सकडे देखील ४ गुणांपर्यंत पोहोचण्याची संधी आहे. पण नेदरलँड्सचा सामना बलाढ्य भारतीय संघासोबत होणार आहे.
