सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात

डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी मात करत युएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

सुपर चषक फुटबॉल : रेयाल माद्रिदला जेतेपद; अलाबा, बेन्झिमाच्या गोलमुळे एनट्रॅक फ्रँकफर्टवर मात
सुपर चषक फुटबॉल : रेयालला जेतेपद

एपी, हेलसिंकी : डेव्हिड अलाबा आणि कर्णधार करीम बेन्झिमा यांनी केलेल्या गोलच्या बळावर स्पॅनिश संघ रेयाल माद्रिदने जर्मन संघ एनट्रॅक फ्रँकफर्टवर २-० अशी मात करत युएफा सुपर चषक फुटबॉल स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

बुधवारी मध्यरात्री फिनलंडची राजधानी हेलसिंकी येथे झालेल्या या सामन्यात गेल्या हंगामातील चॅम्पियन्स लीग विजेत्या माद्रिदने सुरुवातीपासून युरोपा लीग विजेत्या फ्रँकफर्टवर वर्चस्व गाजवले. ३७व्या मिनिटाला माद्रिदच्या व्हिनिसियसने मारलेला फटका फ्रँकफर्टचा गोलरक्षक केव्हिन ट्रॅपने अडवला. मात्र माद्रिदला कॉर्नर किक मिळाली. यावर बेन्झिमा आणि कॅसेमिरोच्या साहाय्याने अलाबाने गोल करत माद्रिदला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर बेन्झिमा आणि व्हिनिसियस यांनी पुन्हा गोलचे प्रयत्न केले. मात्र ट्रॅपला चेंडू गोलजाळय़ात जाण्यापासून रोखण्यात यश आले.

परंतु ६५व्या मिनिटाला व्हिनिसियसच्या पासवर बेन्झिमाने केलेल्या गोलमुळे माद्रिदला २-० अशी आघाडी मिळाली. बेन्झिमाचा हा माद्रिदसाठी ३२४वा गोल ठरला. त्यामुळे त्याने माजी कर्णधार आणि आघाडीपटू राउलला मागे टाकत माद्रिदसाठी सर्वाधिक गोल करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसरे स्थान मिळवले आहे. माद्रिदचे प्रतिनिधित्व करताना केवळ ख्रिस्टियानो रोनाल्डोने (४५०) बेन्झिमापेक्षा अधिक गोल केले आहे. माद्रिदने दोन गोलची आघाडी घेतल्यानंतर फ्रँकफर्टने आक्रमणाची गती वाढवली. मात्र त्यांना माद्रिदचा बचाव भेदण्यात अपयश आले.

विक्रमाशी बरोबरी

रेयाल माद्रिदला यंदा पाचव्यांदा सुपर चषकावर नाव कोरण्यात यश आले. त्यामुळे त्यांनी बार्सिलोना आणि एसी मिलान यांच्या विक्रमाशी बरोबरी केली आहे. या तिन्ही संघांनी प्रत्येकी पाच वेळा सुपर चषक पटकावला आहे. माद्रिदने यापूर्वी २००२, २०१४, २०१६ आणि २०१७ मध्ये हा चषक जिंकला होता.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Super cup football real win title alaba beat frankfurt benzema goal ysh

Next Story
डायमंड लीग अ‍ॅथलेटिक्स : श्रीशंकरला सहावा क्रमांक
फोटो गॅलरी