एका लहान बाळाची आई बनल्यानंतर टेनिस कोर्टवर दणक्यात पुनरागमन करणाऱ्या सेरेना विल्यम्सने, विम्बल्डन ओपनच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सेरेनाची ही दहावी अंतिम फेरी असणार आहे. अंतिम फेरीत सेरेनाची गाठ अँजेलिक कर्बरशी पडणार आहे. सेरेनाने उपांत्य फेरीत जर्मनीच्या ज्युलिया जॉर्जसचा ६-२, ६-४ असा सरळ सेट्समध्ये पराभव केला.

एखाद्या ग्रँड स्लॅम स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची ज्युलियाची ही पहिलीच वेळ होती. मात्र उपांत्य फेरीत सेरेनासमोर तिची डाळ शिजू शकली नाही. विजयानंतर सेरेनाने आपला एक हात उंचावत उपस्थित प्रेक्षकांना अभिवादन केलं. आजच्या सामन्यात सेरेनाच्या एकाही फटक्याचं उत्तर ज्युलियापाशी दिसत नव्हतं. याचा फायदा घेत सेरेनाने सामन्यात बाजी मारली.

  • अँजेलिक कर्बरचीही अंतिम फेरीत धडक, ओस्तापेन्कोवर सहज मात

दुसरीकडे जर्मन खेळाडू अँजेलिक कर्बरने विजेतेपद मिळविण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं आहे. तिने माजी फ्रेंच विजेती येलेना ओस्तापेन्को हिचा ६-३, ६-३ असा सहज पराभव केला. कर्बर हिने २०१६ मध्ये ऑस्ट्रेलियन व अमेरिकन स्पर्धेत अजिंक्यपद मिळविले होते. कर्बरला ओस्तापेन्कोच्या तुलनेत ग्रँड स्लॅमच्या अंतिम फेरीचा अधिक अनुभव आहे, त्याचाच फायदा तिला येथे मिळाला. तिने फोरहँडच्या ताकदवान फटक्यांचा बहारदार खेळ केला. तसेच तिने सर्विसवर योग्य नियंत्रण ठेवले होते. ओस्तापेन्को हिने सर्विस व परतीच्या फटक्यांबाबत चुकांचाही तिला फायदा झाला. दोन्ही सेट्समध्ये कर्बर हिने व्हॉलीजचाही चांगला उपयोग केला. ओस्तापेन्को हिने गतवर्षी फ्रेंच स्पर्धा जिंकली होती. तिच्याकडून येथे त्याच कामगिरीची अपेक्षा होती. मात्र तिला व्हॉलीजवर नियंत्रण ठेवता आले नाही. तसेच कर्बरच्या परतीच्या फटक्यांवर उत्तर देताना तिला अपेक्षेइतका वेग ठेवता आला नाही.