वॉरसॉ : माजी विश्वविजेत्या विश्वनाथन आनंदने एक फेरी बाकी असतानाच शनिवारी सुपरबेट पोलंड बुद्धिबळ स्पर्धेतील जलद (रॅपिड) बुद्धिबळ स्पर्धेचे विजेतेपद पटकावले.

आनंदने सहा सामने जिंकले, तर दोन बरोबरीत सोडवत जलद प्रकारात वर्चस्व गाजवले. सहाव्या फेरीअंती पाच विजय आणि एक बरोबरी स्वीकारणाऱ्या भारताच्या आनंदने सातव्या फेरीत रोमानियाच्या डेव्हिड गॅव्हरिलेस्क्यूला २५ चालींत नामोहरम केले. मग आठव्या फेरीत अमेरिकेच्या फॅबियानो कारूआनाशी २७ चालींत बरोबरी केली. आनंदने पहिल्या फेरीत पोलंडच्या रॅडोस्लॉ वॉजटासझेकवर विजय मिळवला. नंतर दुसऱ्या फेरीत अमेरिकेच्या वेस्ले सो याला आणि तिसऱ्या फेरीत युक्रेनच्या अँटन कारोबोव्हला हरवले. मग चौथ्या फेरीत किरिल शेव्हचेन्कोवर आणि पाचव्या फेरीत लेव्हॉन अरोनियनवर विजय मिळवला. आनंदची सलग पाच विजयांची मालिका सहाव्या फेरीत पोलंडच्या यान-क्रिझस्टोफ डुडाने खंडित केली. जलद बुद्धिबळ स्पर्धा नऊ फेऱ्यांची असून, त्यानंतर होणाऱ्या अतिजलद (ब्लिट्झ) बुद्धिबळ स्पर्धेत प्रत्येक स्पर्धक एकमेकांशी दोनदा सामना करतील.