सध्या भारतामध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) टी ट्वेंटी क्रिकेटचा थरार सुरू आहे. आयपीएल ही क्रिकेट स्पर्धा पुरुषांची असते. या स्पर्धेतून जशी पुरुषांच्या क्रिकेटला अफाट लोकप्रियता मिळाली तशीच लोकप्रियता महिला क्रिकेटलाही मिळावी या हेतूने २०१८ पासून ‘महिला टी ट्वेंटी चॅलेंज’ या क्रिकेट स्पर्धेचा प्रयोग सुरू करण्यात आला होता. महिला टी ट्वेंटी चॅलेंज स्पर्धेचा यावर्षी चौथा हंगाम आहे. यावर्षी २३ मे ते २८ मे या कालावधी दरम्यान ही स्पर्धा पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळवली जात आहे. तीन संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेचा आज अंतिम सामना रंगणार आहे. संध्याकाळी ७ वाजून ३० मिनिटांनी सुरू होणाऱ्या अंतिम सामन्यामध्ये सुपरनोव्हाज आणि व्हेलॉसिटी हे दोन संघ एकमेकांशी भिडणार आहेत.

व्हेलॉसिटी आपले पहिले विजेतेपद जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. तर, हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखालील सुपरनोव्हाज विजेतेपदाची हॅट्रिक करण्यास उत्तुक असेल. सुपरनोव्हाजने ट्रेलब्लेझर्सवर ४९ धावांनी दणदणीत विजय मिळवत आपल्या विजयी मोहिम सुरू केली होती. त्यानंतर त्यांनी व्हेलॉसिटीचादेखील सात गडी राखून पराभव केला होता. दुसरीकडे, व्हेलॉसिटीला त्याच्या शेवटच्या सामन्यात ट्रेलब्लेझर्सकडून १६ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र, धावगती जास्त असल्यामुळे व्हेलॉसिटीला अंतिम सामन्यात प्रवेश मिळाला आहे.

आजच्या अंतिम सामन्यामध्ये व्हेलॉसिटी संघातील किरण नवगिरे या उदयोन्मुख महिला फलंदाजाकडे सर्वांचे लक्ष असणार आहे. ट्रेलब्लेझर्स विरुद्ध व्हेलॉसिटीच्या शेवटच्या सामन्यामध्ये तिने आपल्या नावावर एक अनोखा पराक्रम नोंदवला होता. १९१ धावांचा लक्ष्याचा पाठलाग करताना तिने केवळ १५ चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण केले होते. तिने ३४ चेंडूत ६९ धावांची धडाकेबाज खेळी करून सर्वांना प्रभावित केले होते. त्यामुळे आजच्या सामन्यात ती कसा खेळ करणार याबाबत उत्सुकता आहे.

या स्पर्धेतील तीन्ही संघाचे नेतृत्व भारतीय महिला क्रिकेटपटूंकडे देण्यात आले आहे. भारतीय महिला क्रिकेट खेळाडूंव्यतिरिक्त दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, वेस्ट इंडीज आणि ऑस्ट्रेलियातील एकूण १२ विदेशी महिला खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या आहेत.

संभाव्य संघ

सुपरनोव्हाज – डिआंड्रा डॉटिन, प्रिया पुनिया, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), तानिया भाटिया (यष्टीरक्षक), सुने लुस, पूजा वस्त्राकर, सोफी एक्लेस्टोन, अलाना किंग, मेघना सिंग, मानसी जोशी

व्हेलॉसिटी – शफाली वर्मा, लॉरा वोल्वार्ड, यास्तिका भाटिया (यष्टीरक्षक), किरण नवगिरे, नत्थकन चँथम, दीप्ती शर्मा (कर्णधार), स्नेह राणा, केट क्रॉस, अयाबोंगा खाका, राधा यादव, माया सोनवणे