महेंद्रसिंह धोनीसोबतच भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनानेही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्विकारली. १५ ऑगस्टच्या संध्याकाळी दोन्ही खेळाडूंनी निवृत्ती जाहीर केल्यामुळे भारतीय क्रिकेटप्रेमींना मोठा धक्का बसला होता. निवृत्तीनंतरही धोनी पुढची काही वर्ष चेन्नई संघाकडून आयपीएल खेळत राहणार आहे. तर दुसरीकडे सुरेश रैनानेही निवृत्तीनंतर कौतुकास्पद पाऊल टाकलं आहे. रैनाने जम्म-काश्मीरमधील ग्रामीण भागांतील क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्याची तयारी दाखवली आहे. जम्मू-काश्मीरचे DGP दिलबाग सिंग आणि अनंतनागचे वरिष्ठ पोलीस अधिक्षक संदीप सिंग यांना पत्र लिहून परवानगी मागितली आहे.

सुरेश रैना सध्या आयपीएलच्या तेराव्या हंगामासाठी युएईमध्ये आहे. पोलीस अधिकाऱ्यांना लिहीलेल्या पत्रात सुरेश रैनाने क्रिकेटपटूंना योग्य मार्गदर्शन आणि तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिल्यास खेळाडू म्हणून त्यांचा कसा विकास होऊ शकतो हे सांगितलं आहे. त्यामुळे रैनाच्या या पत्रावर जम्मू-काश्मीरचं स्थानिक प्रशासन आणि पोलीस अधिकारी काय निर्णय घेतात ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.