Rohit Sharma Returns To MI: आयपीएल २०२६ स्पर्धेतील ४७ वा सामना मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. गुणतालिकेत ९ व्या आणि १० व्या स्थानी असलेल्या संघांमध्ये सुरु असलेला हा सामना दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण जो संघ हा सामना गमावणार, तो संघ स्पर्धेतून जवळजवळ बाहेर पडणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ या सामन्यात पूर्ण जोर लावता दिसून येणार आहे. दरम्यान या महत्वाच्या सामन्यासाठी रोहित शर्मा संघात परतला आहे.
वानखेडे स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात हार्दिक पंड्या खेळू शकणार नाही. हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे त्याच्या जागी सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्स संघाचं नेतृत्व करत आहे. सूर्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक जिंकल्यानंतर त्याने प्लेईंग ११ मध्ये काय बदल केले हे सांगितलं. रोहित शर्मा या सामन्यात खेळणार आहे, अशी घोषणा करताच चाहत्यांनी जोरदार जल्लोष केला. वानखेडे स्टेडियमवर मुंबईचा राजा… रोहित शर्माचा जयघोष केला.
रोहित इन, हार्दिक आऊट
मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यातून बाहेर आहे. तो पाठीच्या दुखण्याने त्रस्त आहे. त्याच्या जागी संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट देखील या सामन्यातून बाहेर आहे. त्याच्या जागी कॉर्बिन बॉशला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्यात आलं आहे. रोहित शर्मा इम्पॅक्ट प्लेअर म्हणून फलंदाजी करण्यासाठी येणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना हिटमॅनची फटकेबाजी पाहायची संधी मिळणार आहे. रोहित रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे काही सामन्यांमध्ये तो खेळू शकला नव्हता. आता लखनौविरूद्धच्या सामन्यात तो पुनरागमन करताना दिसून येणार आहे. रोहितकडून या सामन्यात मोठ्या खेळीची अपेक्षा असणार आहे.
मुंबईचा संघ असा आहे
रायल रिकलटन, नमन धीर, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, विल जॅक्स, राज बावा, कार्बिन बॉश, दीपक चहर, जसप्रीत बुमराह, अल्ला गनफझर, राघू शर्मा.
इम्पॅक्ट प्लेयर्स- रोहित शर्मा, मयांक रावत, रॉबिन मिन्झ, शार्दूल ठाकूर, ट्रेंट बोल्ट
