देवेंद्र पांडे | इंडियन एक्सप्रेस

Suryakumar Yadav Removed As India T20I Captain: भारताला तिसरा टी-२० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवबाबत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. टी-२० विश्वचषक जिंकून अवघे तीन महिने उलटत नाहीत तोपर्यंत भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव याच्याबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांपूर्वी त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आलं असून, पुढे संघात त्याचे स्थानही अनिश्चित मानले जात आहे.

बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना सांगितलं, “निवड समिती, बीसीसीआय आणि संघ व्यवस्थापनाने मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्याशी चर्चा करून आता नव्या कर्णधारासोबत पुढे जाण्याचा निर्णय घेतला आहे. सूर्यकुमारच्या नेतृत्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक जिंकला, पण त्याची सध्याची कामगिरी आणि भविष्यातील नियोजन लक्षात घेता आता बदलाची वेळ आली आहे, असे सर्वांचे मत झालं आहे. सूर्याचा संघात निवडीसाठी देखील विचार केला जाणार नाही आणि हा निर्णय लवकरच सूर्यकुमारला कळवला जाईल.”

या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली असून, आता संघाच्या टी-२० नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर सोपवली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. सूर्यकुमार यादव याची फलंदाजीतील खराब कामगिरी ही निवडकर्त्यांसाठी मोठी चिंतेची बाब ठरली आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो सातत्याने फॉर्मसाठी झगडत असून, आयपीएल २०२६ हंगामातही त्याच्या कामगिरीत घसरण कायम राहिली.

हंगामातील शेवटच्या सामन्यात राजस्थान रॉयल्सविरुद्ध अर्धशतक झळकावत त्याने मोसमाची सांगता केली. मात्र, संपूर्ण स्पर्धेत १३ डावांत त्याला केवळ २७० धावा करता आल्या. यादरम्यान त्याची सरासरी फक्त २०.७६ इतकी राहिली, जी त्याच्या दर्जाच्या फलंदाजासाठी निराशाजनक मानली जात आहे.

मार्चमध्ये सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वाखाली भारताने तिसरं टी-२० विश्वचषक विजेतेपद पटकावलं असलं, तरी त्याच्या फलंदाजीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. कर्णधार म्हणून यश मिळाले, मात्र त्याची वैयक्तिक कामगिरी मात्र अपेक्षेप्रमाणे उंचावू शकली नाही.

२०२४ मध्ये रोहित शर्मा याने टी-२० विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. त्यानंतर भारतीय टी-२० संघाची धुरा सूर्यकुमार यादवकडे सोपवण्यात आली होती. मात्र, नेतृत्वाची जबाबदारी सांभाळतानाच त्याची फलंदाजी सातत्याने चर्चेचा विषय ठरत राहिली.