Suryakumar Yadav Gave His Man Of The Match Award: भारताला सलग दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरुन काढून टाकण्यात आलं आहे. यासह संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. बीसीसीआयने आगामी आयर्लंड आणि इंग्लंडविरूद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या मालिकेसाठी श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. तर सूर्याला संघातही स्थान देण्यात आलेलं नाही. फ्लॉप कामगिरीमुळे संघाबाहेर केल्यानंतर आता टी-२० मुंबई लीग स्पर्धेत त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. मराठा रॉयल्स संघाविरूद्ध झालेल्या सामन्यात सूर्याने कॅप्टन इनिंग खेळून आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला आहे. दरम्यान सामन्यानंतर त्याने मन जिंकणारी कृती केली आहे.
टी-२० मुंबई लीग स्पर्धेत सोमवारी झालेल्या सामन्यात मराठा रॉयल्स आणि ट्रायम्प नाईट्स हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. वानखेडे स्टेडियमवर पार पडलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या मराठा रॉयल्स संघाचा डाव १५२ धावांवर आटोपला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ट्रायम्प नाईट्स संघाला सुरुवातीला मोठे धक्के बसले. पण कर्णधार सूर्यकुमार यादवने एक बाजू धरुन ठेवली. सूर्याने ३६ चेंडूंचा सामना करत नाबाद ७२ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने आपल्या संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
दमदार अर्धशतकी खेळीच्या बळावर सूर्यकुमार यादवची सामनावीर म्हणून निवड करण्यात आली. पण मोठ्या मनाच्या सूर्या दादाने आपला सामनावीराचा पुरस्कार हा आपल्या संघातील युवा गोलंदाज सिल्व्हेस्टर डिसोझाला दिला. सूर्याने या सामन्यात धावांचा पाठलाग करताना अर्धशतकी खेळी केली, त्यामुळे तो सामनावीर पुरस्काराचा मानकरी ठरला होता. पण पहिल्या डावात गोलंदाजी करताना सिल्व्हेस्टर डिसोझाने ५ गडी बाद केले होते. सूर्याने सिल्व्हेस्टर डिसोझाचं कौतुकही केलं. सूर्याच्या या मन जिंकणाऱ्या कृतीमुळे त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला जात आहे.
ट्रायम्प नाईट्सचा संघ या सामन्यात १५३ धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. या आव्हानाचा पाठलाग करताना ट्रायम्प नाईट्सला हवी तशी सुरुवात मिळाली नाही. सलामीला आलेला अखिल हेरवाडकर (५) आणि वेदांत मुरकर (११) केवळ ३६ धावांवर बाद झाले. मात्र, नूतन गोयल आणि सूर्यकुमार यांनी तिसऱ्या विकेटसाठी निर्णायक १०३ धावांची भागीदारी करून डाव सावरला. नुतन गोयलने ४ चौकार आणि ३ षटकारांसह शानदार ५६ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमारने केवळ ३६ चेंडूंमध्ये नाबाद ७२ धावांची खेळी केली. कर्णधाराच्या या खेळीत १३ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. त्याने ४ षटके शिल्लक असताना आपल्या संघाला विजय मिळवून दिला. नाईट्स संघाला विजयासाठी केवळ १४ धावांची गरज असताना १५ व्या षटकात गोयल बाद झाला असला तरी, या जोडीने विजयाचा निकाल आधीच निश्चित केला होता.
