दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात २१४ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना मी आणि शुभमन गिलने अधिक जबाबदारी घेऊन खेळणे गरजेचे होते. आमच्या अपयशाचा संघाला मोठा फटका बसला, अशी कबुली भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने दिली.
न्यू चंडीगडच्या मुल्लनपूर येथे झालेल्या पहिल्यावहिल्या आंतरराष्ट्रीय सामन्यात विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने उपकर्णधार गिल (०) आणि कर्णधार सूर्यकुमार (५) यांना सुरुवातीलाच गमावले. त्यानंतर भारताला धावगती राखण्यात अपयश आले. गिल आणि सूर्यकुमार यांना गेल्या काही काळात ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आलेली नाही. गिलने गेल्या १७ डावांत, तर सूर्यकुमारने २३ डावांत एकही अर्धशतक केलेले नाही. ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला आता दोन महिन्यांहूनही कमी कालावधी शिल्लक असल्याने या दोघांचे अपयश भारताची चिंता वाढवणारे ठरते आहे. आता सूर्यकुमारनेच स्वतःच्या आणि गिलच्या खेळावर नाखूश असल्याचे म्हटले आहे.
‘‘मी आणि शुभमन संघाला अधिक चांगली सुरुवात करून देऊ शकलो असतो. अभिषेक शर्मा सातत्यपूर्ण कामगिरी करत आहे. परंतु आम्ही प्रत्येक वेळी त्या एकट्यावर अवलंबून राहू शकत नाही. त्याची खेळण्याची शैली पाहता, त्याला कधीतरी अपयश येणारच. अशा वेळी मी, शुभमन आणि अन्य फलंदाजांनी योगदान देणे आवश्यक आहे. या सामन्यात मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना आम्ही अधिक नियोजनबद्ध खेळ केला पाहिजे होता. विशेषतः शुभमन पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर मी जबाबदारी घेऊन जास्तीतजास्त षटके खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न करणे आवश्यक होते. आता आम्ही या चुकांमधून शिकायला हवे आणि पुढील सामन्यांत अधिक दर्जेदार खेळ करायला हवा,’’ असे सूर्यकुमार म्हणाला.
गिल पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर अक्षर पटेलला तिसऱ्या क्रमांकावर पाठविण्याचा निर्णय संघ व्यवस्थापनाने घेतला. अक्षरला २१ चेंडूंत २१ धावाच करता आल्या. त्याला बढती देण्यामागचे कारण विचारले असता, ‘‘गेल्या सामन्यात अक्षरने दीर्घकाळ खेळपट्टीवर टिकण्याची क्षमता दाखवली होती. त्यामुळे आम्ही त्याला अधिक वरच्या क्रमांकावर संधी दिली. आमचा हा निर्णय पूर्णपणे योग्य ठरला नाही हे मान्य, पण अक्षरने चांगली फलंदाजी केली. पुढील सामन्यांत आम्ही असाच निर्णय घेऊ का, हे आताच सांगणे अवघड आहे,’’ असे सूर्यकुमारने सांगितले.
साहाय्यक प्रशिक्षकांकडून पाठराखण
- भारतीय संघाचे साहाय्यक प्रशिक्षक रायन टेन दोएशहाते यांनी धावांसाठी झगडत असलेल्या सूर्यकुमार आणि गिलची पाठराखण केली आहे. खेळाडूंवर विश्वास ठेवायला हवा. त्यांच्यावर अतिरिक्त दडपण टाकण्याची आवश्यकता नाही, असे दोएशहाते म्हणाले.
- ‘‘ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेला आता फारसा वेळ शिल्लक नाही. आम्ही योजना आखल्या आहेत आणि त्यात अचानक बदल करता येणार नाही. तुम्ही गुणवान खेळाडूंना आणि कुशल नेतृत्वाला पाठिंबा दिलाच पाहिजे.’’
- ‘‘सूर्या आणि शुभमनची कामगिरी हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय असल्याचे तुम्हाला बाहेरून बघताना वाटत असेल. परंतु आम्हाला अशी कोणतीही चिंता नाही. आमचा या दोघांवर पूर्ण विश्वास आहे. योग्य वेळी ते सर्वोत्तम कामगिरी करतील याची आम्हाला खात्री आहे,’’ असे दोएशहाते यांनी सांगितले.
