Suryakumar Yadav On IND vs PAK Match: कोलंबोतील आर.प्रेमदासा स्टेडियममध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील हाय व्हॉल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. आधी हा सामना होणार नव्हता, पण अखेर पाकिस्तानला आयसीसीसमोर झुकावं लागलं आहे. त्यामुळे पाकिस्तानचा संघ भारतीय संघाचा सामना करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. दरम्यान या सामन्याच्या एक दिवसाआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना कर्णधार सूर्यकुमार यादवने अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे.

भारतीय संघातील स्टार फलंदाज अभिषेक शर्मा अमेरिकेविरूद्ध झालेल्या सामन्यात खेळताना दिसून आला होता. या सामन्यात तो गोल्डन डकवर माघारी परतला होता. पण त्यानंतर नामिबियाविरूद्धच्या सामन्याआधी तो आजारी पडला होता. त्यामुळ तो दुसऱ्या सामन्यात खेळू शकला नव्हता. त्यानंतर पाकिस्तानविरूद्ध होणाऱ्या सामन्यात तो खेळणार नसल्याची चर्चा सुरू होती. पण सूर्यकुमार यादवने, अभिषेक शर्माच्या खेळण्याबाबत मोठी अपडेट दिली आहे. या सामन्यात अभिषेक शर्मा खेळणार आहे. असं झाल्यास भारतीय संघाची फलंदाजी आणखी बळकट होईल. असं झाल्यास संजू सॅमसनला विश्रांती दिली जाईल.

मुख्य बाब म्हणजे, सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषद घेण्यापूर्वी पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने अभिषेक शर्माला प्लेईंग ११ मध्ये स्थान देण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. अभिषेक शर्मा अजूनही पूर्णपणे फिट झालेला नाही. पण पाकिस्तानचा कर्णधार म्हणाला, ” “आम्हाला सर्वोत्तम खेळाडूंचा सामना करायचा आहे. मी आशा करतो की, अभिषेक शर्मा पूर्णपणे फिट असेल आणि उद्या होणाऱ्या सामन्यात खेळताना दिसेल. आम्हाला मजबूत संघाविरुद्ध खेळायचं आहे.”

सलमान अली आघाने केलेली मागणी सूर्यकुमार यादवने मान्य केली आहे. “चला, तुम्हाला वाटतं ना अभिषेक शर्माने खेळावं, चालतंय. खेळवू त्याला आम्ही.” सूर्यकुमार यादवने पत्रकार परिषदेत अभिषेक शर्मा खेळणार असल्याची माहिती तर दिली आहे. पण तो प्रत्यक्षात खेळणार की नाही, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. कारण त्याच्या फिटनेसबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

पाकिस्तानचा कर्णधार सलमान अली आघाला हँडशेकबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. याबाबत बोलताना तो म्हणाला, “क्रिकेटमध्ये खेळ भावना असायला हवी. माझं वैयक्तिक मत फार महत्वाचं नसेल. पण क्रिकेट नेहमी आधी जसे होते तसेच खेळायला हवे. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवावं.” याआधी झालेल्या आशिया चषक २०२५ स्पर्धेत दोन्ही संघ ३ वेळा आमनेसामने आले होते. या तिन्ही सामन्यांमध्ये भारतीय भारतीय खेळाडूंनी हँडशेक करण्यास नकार दिला होता. यावेळी हँडशेक होणार की नाही, हे देखील पाहणं महत्वाचं ठरणार आहे.