कर्णधार सूर्यकुमार यादव आणि गौतम गंभीर खूप वर्षांपूर्वी आयपीएल स्पर्धेत कोलकाता नाईट रायडर्स संघाचा भाग होते. यामुळे या दोघांचे ऋणानुबंध तेव्हापासूनचे आहेत. त्यावेळच्या कोलकाता संघाचं कोण होतं हे दाखवणारा एक फोटो व्हायरल होतो आहे. यानिमित्ताने कोच, कॅप्टन यांच्यासह सपोर्ट स्टाफ त्यावेळी एकाच संघाकडून खेळत असल्याचं स्पष्ट होत आहे.

गौतम गंभीर कोलकाता नाईट रायडर्स संघाचा कर्णधार होता. सलामीला येऊन मोठ्या धावसंख्येसाठी पाया रचून द्यायचा. मधल्या फळीत रायन टेन डुस्काटा खेळत असे. असोसिएट देश नेदरलँड्सचा प्रतिनिधी असलेला डुस्काटा अनेक वर्ष कोलकाता संघाकडून खेळला. रायन भारतीय संघाचा सहाय्यक प्रशिक्षक आहे.

जॅक कॅलिस, शकीब अल हसन, युसुफ पठाण, रॉबिन उथप्पा यांच्यामुळे मधल्या फळीत सूर्यकुमार यादवला स्थान मिळत नसे. सूर्या त्यावेळी फिनिशरचं काम करत असे. सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत असे. कोलकाता संघाकडून चार वर्ष खेळला. त्यानंतर कोलकाताने त्याला रिलीज केलं. मुंबई इंडियन्स संघाने त्याला ताफ्यात समाविष्ट केलं. तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी दिली आणि सूर्याचं नशीब पालटलं. मुंबई इंडियन्ससाठी खोऱ्याने धावा केल्यानंतर सूर्याने वयाच्या तिशीत भारतीय संघासाठी पदार्पण केलं. पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार लगावण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे. टी२० प्रकारात अनोखे फटके आणि प्रचंड सातत्य यामुळे सूर्याने आयसीसी टी२० क्रमवारीत अव्वल स्थानी झेप घेतली. टी२० संघाचा तो अविभाज्य भाग झाला. रोहित शर्माने टी२० प्रकारातून निवृत्ती स्वीकारल्यानंतर सूर्याकडे भारतीय संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं. नेतृत्वाची धुरा सांभाळताना सूर्याने भारताला सातत्याने विजयपथावर ठेवलं आहे.

या तिघांच्या बरोबरीने मॉर्ने मॉर्केल कोलकाता संघात होता. उंचपुरा मॉर्केल उसळते चेंडू, यॉर्कर यांनी प्रतिस्पर्धी फलंदाजांना हैराण करून सोडत असे. दक्षिण आफ्रिकेसाठी खेळतानाचा त्याचा अनुभव कोलकाता संघालाही उपयुक्त ठरत असे. उमेश यादवच्या बरोबरीने मॉर्ने वेगवान माऱ्याचं आक्रमण सांभाळत असे.

Kolkata Knight Riders Team with captain suryakumar yadav and india currant Support staff
कर्णधार सूर्यकुमार यादव आणि भारताचा सध्याचा सपोर्ट स्टाफसह कोलकाता नाईट रायडर्स संघाचा जुना फोटो

एकत्र खेळलेल्या या चौघांपैकी सूर्यकुमारकडे भारतीय संघाची सूत्रं आहेत तर बाकी तिघे कोचिंग टीमचा भाग आहेत. कोचिंगच्या निमित्ताने कोलकाता नाईट रायडर्स संघाकडून खेळलेल्या या चौघांचं झकास रियुनियन झालं आहे.