Abhishek Sharma On World Cup Win: आयसीसी टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात भारत आणि न्यूझीलंड हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २५५ धावांचा डोंगर उभारला होता. हा डोंगर उभारण्यात टॉप ३ फलंदाजांनी मोलाची भूमिका बजावली. सुरुवातीच्या तिन्ही फलंदाजांनी दमदार अर्धशतकं झळकावली. संपूर्ण स्पर्धेत फ्लॉप राहिलेल्या अभिषेक शर्माने अंतिम सामन्यात अवघ्या १८ चेंडूत अर्धशतक झळकावलं. दरम्यान विजयानंतर अभिषेक शर्माने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत.

टी -२० वर्ल्डकप स्पर्धा सुरू होण्याआधी अभिषेक शर्मा तुफान फॉर्ममध्ये होता. पण स्पर्धेतील सुरुवातीच्या दोन्ही सामन्यामध्ये तो शून्यावर माघारी परतला होता. त्यामुळे त्याला प्लेईंग ११ मधून बाहेर करण्याची मागणी केली जात होती. पण जेव्हा संघाला सर्वात जास्त गरज होती. त्यावेळी त्याने संघासाठी दमदार खेळी केली आहे. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध खेळताना भारतीय संघाला वेगवान सुरुवातीची गरज होती. अशीच काहीशी सुरुवात अभिषेक शर्माने करून दिली आणि अवघ्या १८ चेंडूत आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेतील वेगवान अर्धशतक झळकावलं.

या सामन्यानंतर बोलताना अभिषेक शर्मा म्हणाला, “मला कळत नव्हतं की मला नेमकं काय झालं होतं. नेट प्रॅक्टिसही व्यवस्थित होत होती. पण फॉर्म मिळत नव्हता. पण संघातील सर्व वरीष्ठ खेळाडू, प्रशिक्षक गौतम गंभीर मला सांगत होते की तू मोठे सामने संघाला जिंकवून देशील. मला स्काय आणि गौती एकच गोष्ट म्हणाले की संघ काय सांगतो तेच महत्त्वाचं असतं, बाहेर कोण काय म्हणतं हे महत्त्वाचं नसतं. मी त्यावरच फोकस केला. त्यानुसार खेळून मला मजा आली.”

तसेच तो पुढे म्हणाला की, “मी कधीच खराब फॉर्मचा अनुभव घेतला नव्हता. पण या वर्ल्डकपमध्ये या परिस्थितीमुळे मी जास्त खंबीर झालो. अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी तयार झालो. या काळात मी फोनवर अजिबात लक्ष देत नव्हतो. बाहेरच्या जगात काय चर्चा चालू आहे त्याकडे मी पूर्णपणे दुर्लक्ष करत होतो. सगळे इतर खेळाडू हेच सांगत होते की वाट पाहा, तेरा टाईम आएगा. आता मी फ्लॅशबॅक करून पाहतोय तर आजच्या महत्त्वाच्या दिवशी हे घडलं याचा मला खूप आनंद झालाय.”