Suryakumar Yadav IND vs AUS 1st T20I: भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-२० मालिकेतील कॅनबेरामधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला आहे. पण या पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार व उपकर्णधाराने उत्कृष्ट फलंदाजी केली. गिल-सूर्याने ३५ चेंडूत ६२ धावांची भागीदारी रचली. तर कर्णधार सूर्या वेगळ्याच फॉर्मात होता. ३९ धावांच्या खेळीत सूर्याने एक मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकत भारताला फलंदाजीसाठी पाचारण केलं. पण पावसाने मात्र ५ षटकांपूर्वीच गोंधळ घातला. त्यानंतर सूर्याची चौकार-षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. सूर्यादादाने २४ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावांची खेळी केली. जोश हेझलवुडच्या गोलंदाजीवर सूर्याने लगावलेला त्याचा ट्रेडमार्क गगनचुंबी षटकार कमालीचा होता.
भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने त्याच्या टी-२० कारकिर्दीत १५० षटकारांचा टप्पा पूर्ण केला आहे. यासह हा टप्पा गाठणारा सूर्या जगातील फक्त पाचवा फलंदाज बनला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात त्याने दोन गगनचुंबी षटकार लगावत ही कामगिरी केली.
सूर्यकुमार यादव टी-२० मधील षटकारांचा बादशाह
सूर्यकुमार यादव हा १५० टी-२० षटकार लगावणारा भारताचा दुसराच खेळाडू आहे. रोहित शर्माने ही कामगिरी केली होती, जो सर्वाधिक षटकारांच्या यादीत पहिल्या स्थानी आहे. पण डावांच्या बाबतीत सूर्याने रोहितला मागे टाकलं आहे. रोहितने १११ डावांमध्ये हा टप्पा गाठला, तर सूर्यकुमार यादवने फक्त ८६ डावांमध्ये हा टप्पा गाठला. यामुळे तो भारतासाठी सर्वात जलद १५० टी-२० षटकार लगावणारा फलंदाज बनला आहे.
आयसीसीच्या पूर्ण सदस्यीय संघांमध्ये सर्वात जलद १५० षटकारांचा टप्पा गाठणारा सूर्यकुमार यादव हा सर्वात जलद गाठला. यासह टी-२० क्रिकेटमधील पूर्ण सदस्यीय संघांमध्ये १०० पेक्षा कमी डावांत १५० षटकार लगावणारा तो पहिला खेळाडू ठरला आहे.
तर टी-२० क्रिकेटमध्ये सर्वात जलद १५० टी-२० षटकार लगावण्याचा विक्रम संयुक्त अरब अमिरातीच्या मोहम्मद वसीमच्या नावावर आहे, ज्याने फक्त ६६ डावांमध्ये १५० षटकार मारले आहेत. त्यानंतर सूर्यकुमार यादव आहे. न्यूझीलंडच्या मार्टिन गप्टिलने १०१ डावांमध्ये, रोहित शर्माने १११ डावांमध्ये आणि इंग्लंडच्या जोस बटलरने १२० डावांमध्ये हा टप्पा गाठला.
सूर्यकुमार यादवसाठी ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला टी-२० सामना महत्त्वाचा होता. मागील पाच टी-२० सामन्यांमध्ये तो २० धावांपर्यंत पोहोचला नव्हता, परंतु या सामन्यात तो ३० अधिक धावा करण्यात यशस्वी झाला. सूर्याने २०२५ च्या आशिया चषकातील सात सामन्यांमध्ये एकही अर्धशतक झळकावलं नाही आणि फक्त एकदाच २० धावांचा टप्पा ओलांडला. पण, या सामन्यात तो दमदार पुनरागमन करण्यात यशस्वी झाला.
