Suryakumar Yadav Creates History: भारताने अमेरिकेवर विजय मिळवत टी-२० विश्वचषक २०२६ ची सुरूवात विजयाने केली आहे. अमेरिका संघावरचा हा विजय भारतासाठी सहज नव्हता. टीम इंडियाला मोठा संघर्ष करत हा विजय मिळवावा लागला. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला कर्णधार सूर्यकुमार यादव. सूर्याने या सामन्यात नाबाद ८६ धावांची खेळी करत टीम इंडियाला मोठी धावसंख्या गाठून दिली. यासह सूर्यकुमार यादवने टी-२० इतिहासात मोठा पराक्रम केला आहे.
नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजीसाठी उतरलेल्या भारताची सुरुवात निराशाजनक झाली. पॉवरप्लेमध्ये त्यांनी चार विकेट गमावल्या, ज्यामुळे संघ अडचणीत आला. सलामी जोडी आणि मधल्या फळीतील फलंदाज एकामागोमाग एक बाद झाले. भारताने ७७ धावांवर ६ विकेट्स गमावल्या होत्या. टीम इंडिया संकटात असताना अमेरिकेच्या भेदक गोलंदाजीसमोर सूर्या एकटाच उभा ठाकला आणि त्याने अर्धशतकी खेळी केली.
कर्णधार सूर्यकुमार यादवने अशा कठीण स्थितीत एका टोकापासून संघाचा डाव उचलून धरला. सूर्याने प्रसंगी सावध तर संधी मिळताच आक्रमक फटके खेळले. सूर्यकुमारने फक्त ३७ चेंडूत ७ चौकार व एका षटकारासह आपलं अर्धशतक पूर्ण केलं. तर त्याने या सामन्यात ४९ चेंडूत १० चौकार व ४ षटकारांसह ८६ धावांची खेळी केली. यासह त्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला.
टी-२० इतिहासात आता सर्वाधिक वेळेस सामनावीराचा पुरस्कार पटकावणारा सूर्यकुमार यादव हा पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे. त्याने विराट कोहलीला मागे टाकत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकण्याचा विक्रम आपल्या नावे केला आहे. सूर्याने १०५ टी-२० सामन्यांमध्ये १७ सामनावीर पुरस्कार मिळवले आहेत.
टी-२० मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवणारे भारतीय खेळाडू
१७ – सूर्यकुमार यादव – १०५ सामने
१६ – विराट कोहली – १२५ सामने
१४ – रोहित शर्मा – १५९ सामने
८ – अक्षर पटेल – ८८ सामने
टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार मिळवण्यात भारतीय खेळाडूंच्या यादीत सूर्यकुमार यादव दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर विराट कोहली सर्वाधिक सामन्यांसह पहिल्या स्थानी आहे. तर या यादीमध्ये भारताचे युवराज सिंग, रविचंद्रन अश्विन व रोहित शर्मा असे इतर खेळाडू आहेत.
टी-२० विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारे भारतीय खेळाडू
८ – विराट कोहली – ३५ सामने
४ – सूर्यकुमार यादव – १९ सामने
३ – युवराज सिंग – ३१ सामने
३- आर अश्विन – २४ सामने
३ – रोहित शर्मा – ४७ सामने

