Suryakumar yadav Bow down to sanju samson video: भारतीय संघाने वेस्ट इंडिजचा पराभव करत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. भारताच्या या विजयाचा हिरो ठरला संजू सॅमसन. सलामीवीर आणि यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसनच्या ९७ धावांच्या उत्कृष्ट खेळीच्या बळावर टीम इंडियाने हा विजय मिळवला. संजूने या विक्रमी खेळी केली आणि टीम इंडियाच्या विजयाचा मार्ग सोपा केला. संजूच्या या मॅचविनिंग खेळीनंतर सूर्यकुमार यादवने ज्या पद्धतीने त्याचंं कौतुक केलं त्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
सलामीला उतरलेल्या संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाला विजय मिळवून देत नाबाद माघारी परतला. त्यानेच डावाची सुरुवात केली आणि विजयी चौकार मारत सामनाही संपवला. संजू सॅमसनने वेस्ट इंडिजविरुद्ध ५० चेंडूत १०४ च्या स्ट्राईक रेटने १२ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद ९७ धावा केल्या. टी-२० विश्वचषकात धावांचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजाने केलेली ही सर्वोच्च खेळी होती. यापूर्वी हा विक्रम विराट कोहलीच्या नावावर होता, ज्याने ८२ धावा केल्या होत्या.
भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात सात धावांची आवश्यकता होती. संजू सॅमसनने पहिल्याच चेंडूवर एक षटकार आणि मग चौकार मारत विजय निश्चित केला. त्याच्या शानदार कामगिरीसाठी संजू सॅमसनला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. सामना संपल्यानंतर संजू मैदानात बसत त्याने हेल्मेट व बॅट बाजूला टाकली आणि आभाळाकडे पाहत देवाचे आभार मानले.
संजूच्या खेळीचं सूर्याने खास अंदाजात केलं कौतुक
संजू या खेळीनंतर वेस्ट इंडिजच्या खेळाडूंना हात मिळवत ड्रेसिंग रूमच्या दिशेने जात होता. तर भारताचे खेळाडू डगआऊटमधून त्याच्या भेटीला येत होता. सर्वात पुढे कर्णधार सूर्यकुमार यादव होता. सूर्याने त्याला पाहताच डोक्यावरची टोपी काढली आणि त्याच्यासमोर झुकून त्याच्या खेळीचं कौतुक केलं. संजू यानंतर सूर्याला घट्ट मिठी मारली. टीम इंडियाच्या ताफ्यातील हा भावुक क्षण सर्वांची मनं जिंकणारा ठरला. यानंतर इशान, तिलक, हार्दिक कोच गौतम गंभीर यांनी संजूला मिठी मारत त्याचं या खेळीसाठी कौतुक केलं.
आता भारताचा सेमीफायनल सामना हा इंग्लंड संघाविरूद्ध होणार आहे. हा सेमीफायनल सामना ५ मार्चला होणार असून मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जाईल. भारत आणि इंग्लंड यांच्यात सलग तिसऱ्यांदा सेमीफायनल होणार आहे. त्यामुळे या सामन्यात कोण बाजी मारणार यावर सर्वांच्या नजरा असतील.
