Suryakumar Yadav Statement On Dropped From Team India: भारतीय संघाचा स्टार खेळाडू सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. पण ही स्पर्धा झाल्यानंतर बीसीसीआयने मोठा निर्णय घेत त्याला टी-२० संघातून आणि कर्णधारपदावरून काढून टाकलं. त्यानंतर श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली. आयर्लंड दौऱ्यापासून श्रेयस अय्यरने भारतीय टी-२० संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी स्वीकारली आहे. त्यानंतर भारतीय संघाला लागोपाठ २ मालिका गमवाव्या लागल्या. आता कर्णधारपदाबाबत सूर्यकुमार यादवने मोठं वक्तव्य केलं आहे.
कर्णधारपदावरून काढून टाकल्यानंतर काही महिने उलटल्यानंतर, सूर्यकुमार यादवने अखेर मौन सोडले आहे. ज्यावेळी माझं नाव संघातून वगळण्यात आलं, तेव्हा माझ्या चेहऱ्यावर हसू होतं, असं सूर्या म्हणाला. यासह २०२८ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करायचं होतं, असंही तो म्हणाला.
भारताचा माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रासोबत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “जेव्हा भारतीय संघाच्या यादीत माझं नाव नव्हवं, हे पाहून मला हसू आलं. कारण जेव्हा जेव्हा मी भारतीय संघासाठी खेळत होतो किंवा मग दबावाच्या स्थितीत खेळतो, गोष्टी मनाविरुद्ध होत असतील तेव्हा मी नेहमीच हसलो आहे आणि शांत राहिलो आहे. भूतकाळात मला जेव्हा जेव्हा चांगली कामगिरी करण्याची संधी मिळाली, त्या क्षणाबद्दल मी नेहमीच कृतज्ञ राहिलो आहे.”
तसेच तो पुढे म्हणाला की, “असं काही होईल मला वाटलंही नव्हतं. २०२६ मध्ये संघात आल्यानंतर मला वाटलं की, मी या संघाला आणखी पुढे घेऊन जाईन. ऑलिम्पिक स्पर्धा येतील त्यानंतर आणखी एक वर्ल्डकप येईल. पण नेमकं त्याचवेळी आपण काय विचार करतोय आणि समोरचा व्यक्ती काय विचार करतोय, या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत.”
“त्यांना वाटलं भविष्याच्या दृष्टीने हा निर्णय योग्य आहे, म्हणून त्यांनी हा निर्णय घेतला. पण मी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. कारण मला जाणवले की, हा त्यांचा निर्णय होता. भविष्यात जर हा संघ इतर कोणाच्या नेतृत्वात आणखी चांगली कामगिरी करू शकला, तर काही हरकत नाही.”
