Suryakumar Yadav Devisha Shetty Buy Luxury Home In Dubai Details: भारताचा टी-२० विश्वचषक विजेता कर्णधार सूर्यकुमार यादव सध्या भारतीय संघापासून दूर आहे. भारताला विश्वचषक जिंकून देणारा आणि रोहित शर्मानंतर टी-२०मध्ये भारताचा दबदबा कायम राखणारा सूर्या सध्या क्लब क्रिकेट खेळत आहे. पण यादरम्यान सूर्यादादा वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. सूर्यकुमार यादव व देविशा शेट्टी यांनी दुबईत आलिशान घर खरेदी केलं आहे. याचा व्हिडीओ सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे.

सूर्यकुमार यादवने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटद्वारे दुबईमध्ये घर खरेदी केल्याची माहिती दिली आहे; तसेच, ज्या कंपनीकडून त्याने ही मालमत्ता खरेदी केली, त्या कंपनीलाही त्याने टॅग केलं आहे. त्याने दुबईतील आपलं पहिलं नवीन घर ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’ (Danube Properties) कडून खरेदी केलं आहे. आयपीएल स्पर्धेदरम्यान डॅन्यूब प्रॉपर्टीजच्या अनेक जाहिराती पाहायला मिळाल्या होत्या.

सूर्यकुमार यादवने दुबईमध्ये अशा ठिकाणी घर खरेदी केलं आहे, जिथे बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानच्या मालकीची एक इमारत उभारली जात आहे. शाहरुख खानच्या इमारतीचे बांधकामही ‘डॅन्यूब प्रॉपर्टीज’तर्फेच केलं जात आहे. पण टीम इंडियाच्या या माजी कर्णधाराने दुबईत घर का खरेदी केलं? त्याने या निर्णयामागचं एक महत्त्वाचं कारण सांगितलं आहे.

सूर्यकुमार यादवने सांगितलं की, आम्ही इथे आयपीएल खेळलो आहे, मी २०१४ मध्ये आयपीएल खेळण्यासाठी पहिल्यांदा दुबईला आलो होतो. त्यानंतर २०२० मध्ये आम्ही पुन्हा इथे आलो आणि आता संपूर्ण भारतच दुबईला येत आहे. येथील जीवनशैली पूर्णपणे वेगळी आणि आलिशान आहे. सुरक्षा तर भारतामध्येही आहे, जिथे मी राहतो. पण दुबई पण सुरक्षेच्या दृष्टीने चांगली आहे.

दुबईमधील सूर्यकुमार यादवच्या घराची वैशिष्ट्ये व किंमत

सूर्यकुमार यादवने खरेदी केलेली ही मालमत्ता ‘मॅरिटाइम सिटी’च्या अगदी मध्यभागी, पाण्यालगतच्या एका आलिशान निवासी भागात स्थित आहे. या घरामध्ये ४० हून अधिक उच्च-दर्जाच्या सुविधा उपलब्ध आहेत, ज्यामुळे ते अधिकच आकर्षक बनलं आहे. मात्र, ज्या वैशिष्ट्याने सूर्यकुमार यादवचे मन खरोखर जिंकलं, ते म्हणजे ‘लॉन्जिव्हिटी लाउंज’ (Longevity Lounge); सूर्याच्या मते, निवासी प्रकल्पांमध्ये अशा सुविधा क्वचितच पाहायला मिळतात.

दुबई मॅरिटाइम सिटीमधील डॅन्यूब प्रॉपर्टीजच्या प्रकल्पांमध्ये ओशनझ (Oceanz), ब्रीझ (Breez) आणि शाहरुखझ रेसिडेन्सेस (Shahrukhz Residences) यांचा समावेश आहे. डॅन्यूब प्रॉपर्टीजच्या वेबसाईटनुसार, या प्रकल्पांतील घरांच्या सुरुवातीच्या किमती साधारणपणे २.८५ कोटी ते १४.२३ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक आहेत.