Suryakumar Yadav Instagram Post: भारताला टी-२० विश्वचषक २०२६ जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला आता संघातून वगळण्यात आलं आहे. सूर्याचं केवळ कर्णधारपदच काढून घेण्यात आलं नाही, तर त्याला संघातूनही वगळण्यात आलं आहे. यादरम्यान आता टीम इंडिया टी-२० सामन्यांमध्ये विजय मिळवण्यासाठी मोठे प्रयत्न करताना दिसत आहे. त्यानंतर, अचानक सोशल मीडियावर एक विधान व्हायरल झालं, ज्यामुळे सूर्या संघाची थट्टा करत असल्याच्या चर्चांना उधाण आलं; मात्र, आता खुद्द सूर्यानेच या संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिलं आहे.

सूर्यकुमार यादवने सोशल मीडियावर एक निवेदन जारी केलं आहे. टीम इंडियाला पाठिंबा दर्शवण्यासोबतच, त्याने युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीचं देखील कौतुक केलं. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात भारताला विजय मिळवून देणाऱ्या कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी लोकांना सोशल मीडियावर आपल्याबद्दल पसरवणाऱ्या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलं आणि स्पष्ट केलं की, त्या अफवांशी आपला काहीही संबंध नाही.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये त्याने म्हटलं आहे की, “संघासाठी मला खूप आनंद होत आहे आणि त्यांना मनापासून शुभेच्छा. हे सर्व खेळाडू संघासाठी सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करत आहेत आणि त्यांना माझा कायम पाठिंबा असेल. वैभवसाठी एक विशेष मेसेज, तू अशा एका प्रवासाची सुरूवात केली आहेस जो अत्यंत रोमांचक आणि अविस्मरणीय ठरणार आहे. प्रत्येक क्षणाचा आनंद घे आणि आपल्या देशाला असेच गौरवास्पद यश मिळवून देत राहा.”

सूर्या पुढे म्हणाला, “सोशल मीडियावर माझ्या नावाने वक्तव्य व्हायरल होत असल्याचं माझ्या निदर्शनास आलं आहे. मात्र, ते पूर्णपणे खोटं असून मी असं कोणतंही वक्तव्य केलेलं नाही. त्यामुळे अशा कोणत्याही माहितीवर विश्वास ठेवू नका किंवा ती पुढे शेअर करू नका. भारतीय क्रिकेट, माझे सहकारी खेळाडू आणि या खेळाबद्दलचा माझा पाठिंबा नेहमीच कायम राहील. माझ्या नावाने खोटेपणाने पसरवल्या जाणाऱ्या विधानांपेक्षा माझी कृतीच अधिक बोलकी आहे.”

सूर्याचं हे वक्तव्य अशावेळी समोर आलं आहे, जेव्हा इंग्लंड दौऱ्यावर असलेला भारतीय संघ पाच सामन्यांच्या टी-२- मालिकेत ०-१ ने पिछाडीवर आहे. ओल्ड ट्रॅफर्डवरील मोठ्या पराभवानंतर संघावर दबाव वाढला असून, आगामी टी-२० विश्वचषकाचा विचार करून संघ व्यवस्थापन अनुभवी खेळाडूंऐवजी युवा आणि आक्रमक संघबांधणीवर भर देत आहे. अशा स्थितीत सूर्यकुमार यादवने स्वतः पुढे येत केलेल्या स्पष्टीकरणामुळे संघ व्यवस्थापनावर टीका करणाऱ्यांच्या आरोपांना काही प्रमाणात पूर्णविराम मिळाला आहे.