Suryakumar Yadav Record: आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारतीय संघ आपला पहिला सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला आहे. भारतीय संघाचा पहिला सामना अमेरिकेविरूद्ध सुरू आहे. या सामन्यात अमेरिकेने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. हा निर्णय अमेरिकेच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. कारण अमेरिकेच्या गोलंदाजांनी भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठे धक्के दिले. भारताचे प्रमुख फलंदाज स्वस्तात माघारी परतले. पण शेवटी सूर्यकुमार यादवने अमेरिकेच्या गोलंदाजांवर हल्लाबोल केला. सूर्याने या डावात फलंदाजी करताना नाबाद ८४ धावांची खेळी केली. या खेळीच्या बळावर त्याने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.
भारतीय संघाला जेव्हा जेव्हा गरज असते, तेव्हा भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव नेहमीच चांगली कामगिरी करतो. या सामन्यात भारतीय संघाला धावांची गरज असताना सूर्याने सावध सुरूवात केली. त्यानंतर शेवटी संधी मिळताच चौफेर फटकेबाजी केली.या सामन्यात अर्धशतकी खेळी करताच त्याच्या नावे मोठ्या रेकॉर्डची नोंद झाली आहे. सूर्यकुमार यादवने भारताचा कर्णधार म्हणून टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १००० धावा पूर्ण केल्या आहेत. असा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय कर्णधार ठरला आहे. हा पराक्रम त्याने ४१ व्या डावात करून दाखवला आहे.
सूर्याची महत्वपूर्ण खेळी
टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या रेकॉर्ड हा भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नावावर आहे. रोहित शर्माने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना ६२ सामन्यांमध्ये १९०५ धावा केल्या. या यादीत भारताचा माजी कर्णधार विराट कोहली दुसऱ्या स्थानी आहे. विराट कोहलीच्या नावे ५० सामन्यांमध्ये १५७० धावा करण्याची नोंद आहे. तर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीने ७२ टी-२० सामन्यांमध्ये भारतीय संघाचं नेतृत्व करताना १११२ धावा केल्या होत्या. या यादीत सूर्यकुमार यादव चौथ्या स्थानी पोहोचला आहे.
या सामन्याती पहिल्या डावात फलंदाजी करताना भारतीय संघाला सुरूवातीलाच मोठे धक्के बसले होते. सलामीला आलेला अभिषेक शर्मा गोल्डन डकवर माघारी परतला. तर इशान किशनने २० धावा केल्या. शिवम दुबे देखील गोल्डन डकवर बाद झाला. तर रिंकू सिंगने ६, हार्दिक पांड्याने ५ आणि अक्षर पटेलने १४ धावांची खेळी केली. कर्णधार सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूंचा सामना करत १० चौकार आणि ६ षटकारांच्या साहाय्याने नाबाद ८४ धावांची खेळ केली.
