Suryakumar Yadav Record: भारतात सध्या टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेचा थरार सुरू आहे. या स्पर्धेत भारतीय संघाचा बोलबाला पाहायला मिळाला आहे. सूर्यकुमार यादव पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी मैदानात उतरला आहे. पहिल्या सामन्यापासून भारतीय संघाने चॅम्पियनसारखा खेळ केला आहे. सुपर ८ मध्ये स्थान मिळवल्यानंतर नेदरलँड्सविरुद्धचा सामना हा भारतीय संघासाठी सराव सामन्यात सारखाच होता. या सामन्यात भारतीय संघाने दमदार खेळ केला आणि एकतर्फी विजयाची नोंद केली. भारतीय संघ या स्पर्धेत अजिंक्य आहे. दरम्यान या सामन्यात भारतीय संघाने मोठा रेकॉर्ड आपल्या नावावर केला आहे.

पहिल्यादांच टी -२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करत असलेल्या सूर्यकुमार यादवने सुरुवातीच्या ४ सामन्यात अनेक महत्वाचे बदल करून पाहिले आहेत. यासह १६ वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला गेला आहे. भारतीय संघाने या स्पर्धेतील ४ सामन्यांमध्ये १२ गोलंदाजांचा वापर केला आहे. याआधी असं कधीच घडलं नव्हतं. तो असा प्रयोग करणारा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.

याआधी कुठल्याही भारतीय कर्णधाराने एकाच टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत इतक्या गोलंदाजांचा वापर केला नव्हता. याआधी २००९ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने एकूण ११ गोलंदाजांचा वापर केला होता. आता १६ वर्षांनंतर हा रेकॉर्ड मोडला गेला आहे. तर १२ गोलंदाजांचा वापर करणारा सूर्यकुमार यादव हा पहिलाच भारतीय कर्णधार ठरला आहे.

भारतीय संघाचा साखळी फेरीतील शेवटचा सामना नेदरलँड्स संघाविरूद्ध पार पडला. या सामन्यात भारतीय कर्णधाराने एकूण ७ गोलंदाजांचा वापर केला. याआधी झालेल्या साखळी फेरीतील सामन्यांमध्येही भारतीय संघाने वेगवेगळ्या गोलंदाजांकडून गोलंदाजी करून घेतली होती. पहिल्या सामन्यात सिराज खेळला होता. त्या सामन्यात त्याने गोलंदाजी केली. तो बाहेर झाल्यानंतर बुमराहने पुनरागमन केलं. स्पर्धेतील सुरूवातीच्या तिन्ही सामन्यांमध्ये वॉशिंग्टन सुंदरला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. पण नेदरलँड्सविरूद्धच्या सामन्यात त्याला खेळण्याची संधी दिली गेली होती. या सामन्यात सूर्याने त्याला गोलंदाजीही दिली.

भारतीय संघाचं सुपर ८ फेरीचं वेळापत्रक ठरलं आहे. भारतीय संघ सुपर ८ फेरीत दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज या तिन्ही संघांचा सामना करणार आहे. साखळी फेरीत अजिंक्य राहिलेला भारतीय संघ सुपर ८ फेरीतही दमदार कामगिरी करून सेमीफायनलमध्ये प्रवेश करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.