Suryakumar Yadav on Axar Patel Catches IND vs ENG SF: भारतीय संघाने इंग्लंडविरूद्ध उत्कृष्ट कामगिरी करत ७ धावांनी विजय मिळवत फायनल गाठली. कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली टीम इंडिया घरच्या मैदानावर टी-२० विश्वचषकाचा फायनल सामना खेळणार आहे. भारताने दिलेल्या २५४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना इंग्लंडने उत्कृष्ट फलंदाजी केली. पण भारताचं कमालीचं क्षेत्ररक्षण व गोलंदाजांच्या भेदक गोलंदाजीमुळे संघाने अखेरीस विजय मिळवला. यादरम्यान त्याने कोचिंग स्टाफमधील एका व्यक्तीला संघाच्या फिल्डिंगमधील चांगल्या कामगिरीचं श्रेय दिलं आहे.

अक्षर पटेलने या सामन्यात ३ उत्कृष्ट झेल टिपले. एक त्याने फिल सॉल्टला बाद केलं. दुसरा त्याने बुमराहच्या गोलंदाजीवर हॅरी ब्रूकला बाद करण्यासाठी मागे धावत जाऊन वेळीच डाईव्ह मारत अनपेक्षित झेल टिपला. यानंतर अर्शदीपच्या १४व्या षटकात त्याने शिवम दुबेसह सामन्याचा टर्निंग पॉईंट कॅच टिपला. यानंतर त्याच्या कॅचेसबद्दल बोलताना सूर्याने कोणाला क्रेडिट दिलं पाहूया.

अक्षर पटेलच्या कॅचबद्दल बोलताना कर्णधार म्हणाला, “संघाच्या उत्कृष्ट क्षेत्ररक्षणासाठी फील्डिंग कोच दिलीप टी यांनाही श्रेय द्यायला हवं. सराव सत्रांमध्ये ते ज्या पद्धतीने खेळाडूंना प्रशिक्षण देतात, त्यात मजा आणि स्पर्धात्मकता दोन्ही असते. त्यामुळे खेळाडूंनीही उत्तम प्रतिसाद दिला आहे. सरावानंतरही अनेक खेळाडू संघासाठी अतिरिक्त मेहनत घेतात आणि त्याचा परिणाम मैदानावर स्पष्टपणे दिसतो.”

रनचेसदरम्यान सूर्याच्या मनात नेमकं काय सुरू होतं, तो म्हणाला, “खरं सांगायचं तर मी खूपच तणावात होतो. जर कोणी त्या वेळी माझ्या हृदयाचा ठोके तपासले असते, तर ते नक्कीच १६० ते १७५ दरम्यान असते. पण क्रिकेटमध्ये अशी स्थिती अनेकदा येते. हा उपांत्य फेरीचा सामना खूपच रोमांचक होता आणि आता अंतिम फेरीत पोहोचल्याचा आम्हाला खूप आनंद आहे.”

प्रेक्षकांविषयी बोलताना तो म्हणाला, “आम्ही वॉर्म-अपसाठी मैदानावर आलो तेव्हाच स्टेडियम सुमारे ७५ ते ८० टक्के भरलेलं होतं. यावरूनच भारताने आज चांगली कामगिरी करावी, अशी चाहत्यांची किती तीव्र इच्छा होती हे दिसून येतं. आम्ही प्रथम फलंदाजी केली, तेव्हाही आमच्या कामगिरीवर प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अंतिम फेरीपूर्वी आम्ही त्यांना एक उत्तम सामना दिला, अशी आशा आहे.”

अंतिम सामन्याबद्दल बोलताना तो म्हणाला, “अंतिम फेरीत नक्कीच दबाव आणि तणाव असणार, विशेषत: भारतात खेळताना आणि विजेतेपदासाठी लढताना. पण आमचे खेळाडू आणि संपूर्ण सपोर्ट स्टाफ यासाठी तितक्याच उत्साहाने तयार आहेत.”