Suryakumar Yadav Statement on India Win: भारतीय संघाने टी-२० विश्वचषकातील सामन्यात पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने पाकिस्तानचा तब्बल ६१ धावांनी मोठा पराभव केला. भारताचा धावांच्या बाबतीत हा वर्ल्डकप इतिहासातील सर्वात मोठा विजय आहे. दुसऱ्या डावात भारताच्या गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी केली, ज्यामुळे संघाचा विजय अधिक सोपा झाला. भारताच्या या विजयानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवने दिलेल्या वक्तव्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.
भारताने प्रथम फलंदाजी करताना इशान किशनच्या ७७ धावांच्या शानदार खेळीच्या बळावर १७५ धावांचा डोंगर उभारला. कोलंबोच्या खेळपट्टीवर ही धावसंख्या भारतासाठी चांगली ठरली. तर प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संघ १८ षटकांत ११४ धावांवर सर्वबाद झाला. पाकिस्तान गोलंदाजी करत असताना जिथे वेगवान गोलंदाजांची धुलाई होत होती, तिथे हार्दिक पंड्या व जसप्रीत बुमराह या भारताच्या गोलंदाजांनी संघाला पहिल्या २ षटकांत ३ विकेट्स मिळवून दिल्या, ज्यामुळे पाकिस्तान बॅकफूटवर गेला. कर्णधार सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या डावात योग्य वेळी योग्य गोलंदाजांना संधी दिल्याने ठराविक अंतराने टीम इंडियाला विकेट्स मिळाल्या व विजयाचा मार्ग सुकर झाला.
सूर्यकुमार यादव भारताच्या विजयानंतर नेमकं काय म्हणाला?
विजयानंतर सूर्यकुमार यादवला विचारण्यात आलं या विजयानंतर काय वाटतंय, काय सांगशील, तेव्हा सूर्यकुमार यादव म्हणाला, “हा विजय देशवासियांचा आहे.” सूर्यकुमार यादवने हसत हसत दिलेल्या उत्तरानंतर त्याने पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकली आहेत. कॅप्टन पुढे म्हणाला, “आम्हाला ज्या प्रकारचं क्रिकेट खेळायचं होतं, तसंच आम्ही खेळलो. या विकेटवर प्रथम फलंदाजी करणं हा योग्य निर्णय होता. इशानने आऊट ऑफ द बॉक्स विचार केला. ०/१ अशी स्थिती असताना कोणीतरी जबाबदारी घ्यायची गरज होती आणि त्याने ज्या पद्धतीने ती स्वीकारली, ते खरोखरच अप्रतिम होतं.”
या खेळपट्टीवर काय स्कोअर चांगला असेल, असं तुम्हाला वाटलं होतं, याचं उत्तर देताना कर्णधार म्हणाला, “प्रथम फलंदाजी करताना अंदाज बांधणं अवघड असतं, कारण दव पडेल का किंवा लाईट्समध्ये खेळताना पिच कसं असेल, हे सांगता येत नाही. पण आम्हाला वाटत होतं की आम्ही सरासरीपेक्षा सुमारे १५ धावा जास्त केल्या. १५५ धावांवर सामना खूप चुरशीचा झाला असता. पण १७५ धावा ही खूप चांगली धावसंख्या ठरली.”
अखेरीस कर्णधार म्हणाला, “गोलंदाजीमध्ये प्रत्येकाने योगदान दिलेलं पाहून खूप आनंद झाला. आता आम्ही परत जाऊन संघासोबत थोडा वेळ आनंदात घालवू आणि अहमदाबादला रवाना होताना पुढील सामन्यांचा विचार करू.” भारताकडून गोलंदाजीत हार्दिक पंड्या, जसप्रीत बुमराह, अक्षर पटेल, वरूण चक्रवर्ती यांनी प्रत्येकी २-२ विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव व तिलक वर्मा यांनी प्रत्येकी १-१ विकेट्स घेतल्या.
भारताचा पाकिस्तानवरील विजय हा गट टप्प्यातील सलग तिसरा विजय ठरला. या विजयासह टीम इंडियाने टी-२० विश्वचषक २०२६ च्या सुपर-८ फेरीत धडक मारली आहे. आता टीम इंडियाचा गट टप्प्यातील पुढील सामना नामिबियाविरूद्ध होणार आहे.

