scorecardresearch

आजपर्यंतच्या संघर्षांमुळे कणखरता! शतकी खेळीनंतर सूर्यकुमार यादवची भावना

आंतरराष्ट्रीय पदार्पणास झालेला उशीर आणि कारकीर्दीत कराव्या लागलेल्या संघर्षांने मला खूप कणखर बनवले. यातूनच माझी धावांची भूक वाढत गेली, असे मत भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले.

आजपर्यंतच्या संघर्षांमुळे कणखरता! शतकी खेळीनंतर सूर्यकुमार यादवची भावना
(संग्रहित छायचित्र) फलंदाज सूर्यकुमार यादव

पीटीआय, राजकोट

आंतरराष्ट्रीय पदार्पणास झालेला उशीर आणि कारकीर्दीत कराव्या लागलेल्या संघर्षांने मला खूप कणखर बनवले. यातूनच माझी धावांची भूक वाढत गेली, असे मत भारताच्या ट्वेन्टी-२० संघाचा उपकर्णधार सूर्यकुमार यादवने सांगितले.वयाची तिशी उलटून गेल्यावर सूर्यकुमारला भारताकडून पदार्पण करण्याची संधी मिळाली. श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या ट्वेन्टी-२० सामन्यात शतकी खेळी करून सूर्यकुमारने भारताला एकतर्फी विजय मिळवून दिला. सामन्यानंतर बोलताना सूर्यकुमारने कारकीर्दीत कराव्या लागलेल्या संघर्षांचा उल्लेख केला. तो म्हणाला, ‘‘देशांतर्गत क्रिकेट खेळताना मुंबई संघाकडून क्रिकेटचा मनमुराद आनंद लुटला. नेहमीच सर्वोत्तम कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. यानंतरही आंतरराष्ट्रीय पदार्पणाची संधी उशिरा मिळाली. अनेका पातळय़ांवर संघर्ष करावा लागला. पण, या सगळय़ामुळेच मी कणखर बनलो आणि माझी धावांची भूकही वाढली.’’

‘‘गेली काही वर्षे माझ्यासाठी आव्हानात्मक होती. पण, प्रत्येक वेळेस मी मनाला समजावत आलो की क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी खेळायचे आहे. त्यामुळे मी क्रिकेटचा आनंद लुटण्यापलीकडे कसलाच विचार केला नाही. त्यामुळे मला पुढे जाण्याची संधी मिळाली,’’ असेही सूर्यकुमारने ‘बीसीसीआय’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले. विशेष म्हणजे या मुलाखती दरम्यान राहुल द्रविड सूर्यकुमारबरोबर होते.

कारकीर्दीमधील सर्वोत्तम खेळी निवडणे कठीण असल्याचे सांगत सूर्यकुमार म्हणाला, ‘‘मला प्रत्येक वेळेस कठीण परिस्थितीत खेळायची संधी मिळाली आहे. या प्रत्येक खेळीचा आनंद मी घेतला आहे. क्रिकेटचा आनंद घेण्यासाठीच मी खेळत असतो. स्वत:ला सिद्ध करणे एवढेच माझे उद्दिष्ट असते. जेव्हा माझी कामगिरी संघासाठी उपयुक्त ठरते तेव्हा माझा आनंद द्विगुणित होतो.’’

सूर्यकुमारने आपल्या आजपर्यंतच्या यशाचे श्रेय प्रशिक्षक राहुल द्रविड यांनाही दिले. सूर्यकुमार जेव्हा अ-संघाकडून खेळत होता, तेव्हा द्रविड त्या संघाचे प्रशिक्षक होते. आजपर्यंतच्या यशात द्रविड यांचा मोलाचा वाटा आहे. मी जेव्हा क्रिकेटला सुरुवात केली तेव्हा माझ्या खेळात सुधारणा करण्यात द्रविड यांचीच मला मदत मिळाली. त्यांच्यामुळेच मी उभा राहू शकलो, असे सूर्यकुमार म्हणाला. सूर्यकुमारने या वेळी पत्नीने माझ्यासाठी खूप त्याग केल्याचे सांगितले. लग्नानंतर केवळ तिच्यामुळे माझ्या आहारावर नियंत्रण राहिले आणि मला तंदुरुस्ती राखणे शक्य झाले. आमच्या दोघांत क्रिकेटवर बरीच चर्चा होते, असेही सूर्यकुमारने सांगितले.

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 02:40 IST

संबंधित बातम्या