Suryakumar Yadav Fan Touches his feet Video: भारताला टी-२० विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार सूर्यकुमार यादवला आता भारतीय संघातून बाहेर केलं आहे. सूर्याचं कर्णधारपद नाहीतर त्याला टी-२० संघातून वगळण्यात आलं. सूर्याचा गेल्या २ वर्षांतील फॉर्म आणि भविष्याचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला. सूर्या सध्या टी-२० मुंबई लीगमध्ये खेळताना दिसत आहे. या लीगमध्ये सूर्या ट्राईम्फ नाईट्स एमएनई या संघाचं नेतृत्त्व करत आहे. यादरम्यान ९ जून रोजी झालेल्या सामन्यात एक चाहता मैदानात येऊन सूर्याच्या पाया पडला, ज्याचा व्हीडिओ व्हायरल होत आहे.
सूर्यकुमारला संघातून वगळल्यानंतर चाहते फारच भावुक झाले आहेत. सूर्याची कामगिरी व त्याची फलंदाजीचं कौतुक चाहते करताना दिसत आहे. तर सूर्यानंतर आता भारताच्या टी-२० संघाचे नेतृत्त्व श्रेयस अय्यर करणार आहे. सूर्याकडून कर्णधारपद काढून घेत श्रेयस अय्यरला सोपवलं, त्यामुळे संघाची जबाबदारी चांगल्या व योग्य खेळाडूला दिल्याने चाहते नाराज झालेले नाहीत, पण सूर्याचं संघातील स्थान वगळल्याचा रोष चाहत्यांनी दर्शवला.
सूर्या सध्या टी-२० मुंबई लीगमध्ये खेळत असून ९ जूनला ईगल ठाणे स्ट्राईकर्सविरूद्ध झालेल्या सामन्यातील एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. या सामन्यात सूर्या मैदानावर फलंदाजी करत होता. तितक्यात एक चाहता त्याच्या दिशेने मैदानावर धावत आला आणि त्याने थेट त्याचे पाय धरले. चाहत्याने पाय धरताच सूर्या मागे झाला आणि हाताने त्याला मागे सरकावलं. त्यानंतर चाहत्याने थेट सूर्याला मिठी मारली. अंपायरने त्याला बाजूला केल्यानंतर फोटो काढायचा आहे, म्हटल्यास सूर्याने त्याला जवळ बोलावलं आणि त्याच्याबरोबर सेल्फी काढला.
सेल्फी काढल्यानंतर त्याला सिक्युरिटी मैदानाबाहेर घेऊन गेले. त्याला बाहेर नेत असतानाही सूर्याने सांभाळून नेण्यास सांगितलं. सूर्यादादाच्या या मैदानावर कृतीने सर्वांची मनं जिंकली. सूर्याचा हा व्हीडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सूर्याने गेल्या दोन सामन्यांमध्ये उत्कृष्ट वादळी खेळी केल्यानंतर तो गेल्या सामन्यात २० धावा करत बाद झाला.
ईगल ठाणे स्ट्राईकर्स आणि ट्रायम्फ नाईट्स यांच्यातील सामन्यात सूर्याच्या संघाला पराभव पत्करावा लागला. ठाणे संघाने प्रथम फलंदाजी करताना साईराज पाटीलच्या ६९ धावांच्या खेळीच्या बळावर संघाने १७२ धावांचा डोंगर उभारला. तर प्रत्युत्तरात ट्राईम्फ नाईट संघ १४८ धावांवर सर्वबाद झाला.
