‘ती फायनल पुन्हा व्हावी आणि आम्ही तो सामना जिंकावा’, असं सांगत टी२० वर्ल्डकपविजेता सूर्यकुमार यादवने त्या पराभवाची सल बोलून दाखवली. दमदार फॉर्मात असलेल्या भारतीय संघाला २०२३ वनडे वर्ल्डकप स्पर्धेत फायनलमध्ये अनपेक्षित पराभवाला सामोरं जावं लागलं होतं. सूर्यकुमार त्या फायनलचा भाग होता.
भारतीय संघ फायनपर्यंत अपराजित होता. सगळे खेळाडू फॉर्मात होते. फायनलमध्येही भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली होती. मात्र रोहित शर्माच्या विकेटसह भारतीय संघाची लय हरपली. गोलंदाजी करतानाही भारतीय गोलंदाजांनी जोरदार प्रयत्न केले मात्र ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेडचं नशीब जोरात होतं. त्याने जीवदानांचा फायदा उठवत शतकी खेळी साकारली आणि संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.
बीसीसीआयतर्फे नवी दिल्ली इथे आयोजित नमन पुरस्कार सोहळ्यात आयसीसी स्पर्धांची जेतेपदं पटकावणाऱ्या संघांचा गौरव करण्यात आला. या सोहळ्यात राहुल द्रविड, रॉजर बिन्नी आणि मिताली राज यांना जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. या सोहळ्यात काही खेळाडूंना कारकिर्दीतील कोणता क्षण रिप्ले करायला आवडेल असं विचारण्यात आलं. त्यावेळी सूर्यकुमारने २०२३ वनडे वर्ल्डकप फायनलचा उल्लेख केला. त्या पराभवानंतर भारतीय क्रिकेटपटूंच्या डोळ्यात अश्रू तरळले होते. चाहत्यांनाही तो पराभव सहन झाला नाही.
सूर्यकुमार म्हणाला, ‘ती फायनल पुन्हा व्हावी आणि आम्ही जिंकावं असं मनापासून वाटतं. नरेंद्र मोदी स्टेडियमवर आपण जिंकू शकतो हे आता सिद्ध झालं आहे. त्यामुळे चाहत्यांनी मनातून तो ग्रह काढून टाकावा’.
१९ नोव्हेंबर २०२३ रोजी झालेल्या लढतीत ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतला. शुबमन गिल झटपट तंबूत परतला. मात्र रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी डाव सावरला. रोहित ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा समाचार घेत होता. मात्र ग्लेन मॅक्सवेलच्या गोलंदाजीवर ट्रॅव्हिस हेडने त्याचा उलट धावत जाऊन अफलातून झेल टिपला. रोहितने ४७ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने श्रेयस अय्यरला बाद केलं. यानंतर कोहलीला के.एल.राहुलची साथ मिळाली मात्र या कालावधीत ऑस्ट्रेलियाने १०० चेंडू भारताला एकही चौकार-षटकार मारू दिला नाही. कमिन्सनेच कोहलीला त्रिफळाचीत करत ही जोडी फोडली. त्याने ५४ धावा केल्या. यानंतर राहुलने सूत्रधाराची भूमिका स्वीकारत ६६ धावांची खेळी केली. मात्र यासाठी त्याने १०७ चेंडू खर्ची घातले. सूर्यकुमार यादव त्या लढतीत सातव्या क्रमांकावर फलंदाजीला आला. जोश हेझलवूडच्या गोलंदाजीवर १८ धावा करून तो तंबूत परतला. टी२० क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या सूर्यकुमारकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती मात्र तसं झालं नाही. ५० षटकात भारताचा डाव २४० धावांतच आटोपला.
प्रत्युतरादाखल खेळताना डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्श झटपट तंबूत परतले. यामुळे भारताच्या विजयाच्या आशा जिवंत होत्या. पाठोपाठ स्टीव्हन स्मिथही तंबूत परतला. पण यानंतर हेडने भारतीय गोलंदाजांना निष्प्रभ करत शतकी खेळी साकारली. हेडला नशीबाचाही साथ मिळाली. त्याने १५ चौकार आणि ४ षटकारांसह १३७ धावांची खेळी साकारली. मार्नस लबूशेनने ५८ धावांची चिवट खेळी करत त्याला चांगली साथ दिली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी केलेली २१५ चेंडूत १९२ धावांची मॅरेथॉन भागीदारी साकारली. हेडला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित होते. पराभवानंतर त्यांनी ड्रेसिंगरुममध्ये जाऊन खेळाडूंचं सांत्वन केलं. त्यांना धीर दिला. संपूर्ण स्पर्धेत दमदार कामगिरी केल्याबद्दल त्यांनी खेळाडूंचं अभिनंदन केलं.
सामन्याच्या पूर्वसंध्येला ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सला सव्वा लाख क्षमतेच्या स्टेडियमबद्दल विचारण्यात आलं होतं. सव्वा लाख भारतीय चाहत्यांना शांत करणं किती अनोखं असेल असं पॅट कमिन्स म्हणाला होता. ऑस्ट्रेलियाच्या संघाने कमिन्सचे उद्गार खरे ठरवले.
