Suryakumar Yadav Reaction Surfaces After Losing Captaincy: भारताला वर्षभरात आशिया चषक आणि टी२० वर्ल्ड कपचे जेतेपद मिळवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवाला कर्णधार पद अखेर गमवावे लागले आहे. सततच्या खराब फॉर्ममुळे सूर्यकुमारला कर्णधारपदासह संघातूनही डच्चू मिळाला आहे. सूर्यकुमार ऐवजी श्रेयस अय्यरला टी२० संघाचे कर्णधार पद देण्यात आले आहे. त्याच्यासह तिलक वर्माकडे उपकर्णधार पद असेल. या घडामोडीनंतर आता सूर्यकुमार यादवने मौन सोडले आहे.

निवड समितीने आगामी आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यासाठी नव्या टी२० संघाची घोषणा केली. संघाची घोषणा करताना निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी हा मोठा निर्णय जाहीर केला. भारतीय टी-२० संघाच्या भविष्यातील नियोजनात हा महत्त्वाचा बदल मानला जात असून, पुढील टी-२० विश्वचषक लक्षात घेऊन संघ व्यवस्थापनाने नव्या नेतृत्वाची निवड केली आहे.

मुंबई टी२० सामन्यादरम्यान दिली प्रतिक्रिया

श्रेयस अय्यर आणि मी मुंबईत एकत्र खूप क्रिकेट खेळलो आहोत. टी२० संघाचे आताचे तीनही कर्णधार मुंबईतून आले आहेत, याचा आनंद वाटतो, अशी प्रतिक्रिया सूर्यकुमार यादवने दिली आहे.

मुंबई टी२० स्पर्धेत आज ट्रायम्फ्स नाइट्स एमएनइ आणि सोबो मुंबई फाल्कन्स यांच्यात सामना खेळला गेला. यावेळी नाणेफेक करत असताना सूर्यकुमार यादवने ही प्रतिक्रिया दिली.

सूर्यकुमार यादव म्हणाला, “श्रेयस अय्यर भारतीय टी२० संघाचा कर्णधार झाल्याचा मला खूप आनंद आहे. आम्ही एकत्र मुंबईत खूप क्रिकेट खेळलो आहोत. भारतीय टी२० संघाचे शेवटचे तीनही कर्णधार मुंबईचेच आहेत. ही खूप छान भावना आहे.”

रोहित शर्मा, त्यानंतर सूर्यकुमार यादव आणि आता श्रेयस अय्यर टी२० संघाचा कर्णधार असून हे तिघेही खेळाडू मुंबईचे आहेत.

एकमेकांना मिठी मारली आणि…

मुंबई टी२० लीगच्या सामन्यात आज सूर्यकुमार यादव आणि श्रेयस अय्यर एकमेकांच्या समोरासमोर आले. सूर्यकुमार यादव ट्रायम्फ नाइट्स एनएनइ संघाचे नेतृत्व करत होता तर श्रेयस अय्यर सोबो मुंबई फाल्कन्स संघाचे प्रतिनिधित्व करत होता. हा सामना सुरू होण्यापूर्वी सूर्या आणि अय्यर यांनी एकमेकांना मिठीही मारली.

रोहित शर्माकडून दोघांचेही कौतुक

भारताचा माजी कर्णधार रोहित शर्माही या सामन्यासाठी उपस्थित होता. श्रेयसबद्दल बोलताना रोहित शर्मा म्हणाला की, त्याने आयपीएल संघाचे नेतृत्व केले आहे. या अनुभवाचा त्याला नक्कीच फायदा होईल. त्याने २०२४ मध्ये कोलकाता नाइट राइडर्ससाठी चषक जिंकला तर २०२५ मध्ये पंजाब किंग्जला तो अंतिम सामन्यात घेऊन गेला. गेल्या काही वर्षांत त्याने ज्याप्रकारे आयपीएलच्या संघाचे कर्णधार पद भूषवले, ते पाहता मला खात्री आहे की, त्याला हे जमून जाईल.

रोहित शर्मा टी२० मुंबई लीगचा ब्रँड ॲम्बेसेडर आहे. रोहित शर्माने सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाचेही कौतुक केले. त्याच्या नेतृत्वाखाली भारताला या वर्षाच्या सुरुवातीला टी२० विश्वचषकाचे जेतेपद पटकावले, अशी प्रतिक्रिया रोहितने दिली.