Suryakumar Yadav Flop Show In Mumbai T20 League: भारतीय टी-२० संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने २०२६ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत जेतेपदाचा मान पटकावला होता. कर्णधार म्हणून सूर्या सुपरहिट ठरला होता. पण फलंदाजीत तो पूर्णपणे फ्लॉप ठरला. भारताच्या वर्ल्डकप विजयामुळे त्याच्या फलंदाजीवर प्रश्न उपस्थित केले गेले नव्हते. त्यानंतर आयपीएलमध्येही त्याचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. आता मुंबई टी-२० लीग स्पर्धेतही सूर्याची बॅट शांत राहिली आहे.
मुंबई टी-२० लीग स्पर्धेला जोरदार सुरुवात झाली आहे. या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील स्टार आणि मुंबईचे लोकल स्टार खेळाडू एकत्र खेळताना दिसून येणार आहेत. या स्पर्धेत सूर्यकुमार यादव ट्रायम्प नाईट्स संघाचं नेृतृत्व करत आहे. मुंबई नॉर्थ मुंबई पँथर्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात ट्रायम्प नाईट्सचा संघ २१० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला होता. पण या धावांचा पाठलाग करताना सूर्याला १२ चेंडूत अवघ्या १९ धावा करता आल्या. हा सामना ट्रायम्प नाईट्स संघाला गमवावा लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सूर्यकुमार यादवच्या फॉर्मवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे.
ट्रायम्प नाईट्सचा संघ या सामन्यात २१० धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ट्रायम्प नाईट्स संघाला सुरुवातीलाच मोठे धक्के बसले. सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादव फलंदाजीसाठी मैदानात उतरला. त्याने सुरुवातीला काही फटके मारुन पावरप्लेमध्ये संघाची धावसंख्या २ गडी बाद ५६ धावांवर पोहोचवली.
पावरप्लेमध्ये चांगली सुरुवात मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादववर टिकून राहण्याची आणि संघाला विजय मिळवून देण्याची जबाबदारी होती. पण डावखुऱ्या हाताचा फिरकीपटू राहुल सावंतने सूर्याला आपल्या जाळ्यात अडकवलं आणि त्याला १९ धावांवर बाद करत माघारी धाडलं. ट्रायम्प नाईट्सकडून नुतन गोयलने ५६ चेंडूंचा सामना करत ९३ धावांची खेळी केली. पण ही खेळी संघाला विजय मिळवून देण्यासाठी पुरेशी नव्हती. ट्रायम्प संघाला ८ गडी बाद १८८ धावांपर्यंत मजल मारता आली.
सूर्याची कामगिरी पाहता, त्याच्या टी-२० संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहेत. गेल्या १८ महिन्यांपासून त्याला फलंदाजीत सूर गवसलेला नाही. येत्या काही दिवसात भारतीय संघ अफगाणिस्तानविरूद्ध कसोटी आणि वनडे मालिका खेळणार आहे. त्यानंतर आयर्लंडविरूद्धची टी-२० मालिका आणि त्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. आयपीएल २०२६ स्पर्धेतील १३ सामन्यांमध्ये त्याला अवघ्या २७० धावा करता आल्या. तर टी-२० वर्ल्डकपमध्येही त्याची बॅट शांतच राहिली होती. अशीच कामगिरी सुरु राहिली, तर त्याचं कर्णधारपद काढून घेतलं जाऊ शतकं. यासह टी-२० संघातून स्थानही गमवावं लागू शकतं.
