Suryakumar Yadav Gautam Gambhir with T20 WC trophy: कर्णधार सूर्यकुमार यादवच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने मायदेशात टी-२० विश्वचषक २०२६चं जेतेपद पटकावलं. भारताने न्यूझीलंड संघाचा अंतिम सामन्यात एकतर्फी पराभव करत हे जेतेपद आपल्या नावे केलं. टीम इंडिया सलग दोन वेळा टी-२० विश्वचषकाची ट्रॉफी जिंकणारी आणि घरच्या मैदानावर या स्पर्धेचं जेतेपद पटकावणारा पहिला संघ ठरला आहे. या विजयानंतर आता भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव, कोच गौतम गंभीर, आयसीसी चेअरमन जय शाह सिद्धीविनायकाच्या दर्शनाला पोहोचले आहेत.
संघाचा कर्णधार आणि प्रशिक्षक गंभीर मुंबईतील श्री सिद्धीविनायक मंदिरात ट्रॉफीसह दर्शनासाठी पोहोचले. यादरम्यान सूर्याने पुजाऱ्यांच्या हातात ट्रॉफी दिली. त्यानंतर ही विश्वचषकाची ट्रॉफी गणरायाच्या चरणी ठेवण्यात आली आणि त्यानंतर ट्रॉफीची पूजा करून हार घालण्यात आला. यानंतर गंभीर व सूर्याला खास शाल देण्यात आली. ज्याचा व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे.
तत्पूर्वी, मुख्य प्रशिक्षक आणि कर्णधार यांनी आयसीसी अध्यक्ष जय शाह यांच्यासह ट्रॉफी जिंकल्यानंतर लगेचच अहमदाबादमधील हनुमान मंदिराला भेट दिली होती. सर्व सदस्यांनी मंदिरात आशीर्वाद घेतले, ज्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.
भारताचा टी-२० विश्वचषक स्पर्धेतील उपांत्या फेरीतील इंग्लंडविरूद्धचा सामना मुंबईत झाला होता. या सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू गणपती बाप्पाच्या दर्शनाला पोहोचले होते. अभिषेक शर्मा, अक्षर पटेल या खेळाडूंचे व्हीडिओदेखील व्हायरल झाले होते.
भारताने या स्पर्धेत सुपर-८ मधील एक सामना वगळता स्पर्धेतील सर्व सामने जिंकले. सुपर-८मध्ये दक्षिण आफ्रिकेने भारताचा मोठा पराभव केला, या पराभवानंतर टीम इंडियाची झोप उडाली आणि संघात महत्त्वाचे बदल करत थेट जेतेपदाला गवसणी घातली. दरम्यान, भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने अलीकडेच खुलासा केला की अक्षर पटेल याची माफी मागावी लागली होती. विश्वचषकातील दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात अक्षरला प्लेइंग इलेव्हनमधून वगळण्यात आलं, ज्याचा फटका संघाला बसला होता.
संपूर्ण स्पर्धेत संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावलेल्या अक्षरला त्या सामन्यात बाहेर बसावे लागल्याने तो निराश आणि नाराज झाला होता, असंही सांगितलं. तात्पुरती नाराजी असून अक्षर पटेल संघाच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला आणि संधी मिळेल तेव्हा त्याने संघासाठी महत्त्वाचं योगदान दिलं. फायनलमध्येही अक्षर पटेलने ३ विकेट्स घेतल्या. अखेरीस भारताचा ही मोहिम अत्यंत यशस्वी ठरला आणि संघाने स्पर्धा जिंकत विक्रमी तिसऱ्यांदा टी-२० विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. त्यामुळे भारताने आपले तिसरे टी-२० विश्वचषक विजेतेपदही मिळवले.
