Suryakumar Yadav: आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेला येत्या ७ फेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन भारत आणि श्रीलंकेत केले जाणार आहे. याआधी झालेल्या टी – २० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदाचा मान पटकावला होता. यावेळी देखील भारतीय संघातील खेळाडू तुफान फॉर्ममध्ये आहेत. तसेच ही स्पर्धा भारतात होत असल्याने भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान या स्पर्धेला सुरुवात होण्याआधी झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना सूर्यकुमार यादवने वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्माच्या फिटनेसबाबत अपडेट दिली आहे.

काही दिवसांपूर्वी भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी -२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेत भारतीय संघाने ४-१ ने बाजी मारली. पण ही मालिका सुरू होण्याआधीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला. तिलक वर्मा आणि वॉशिंग्टन सुंदर हे दोघेही दुखापतीमुळे संघाबाहेर झाले होते.

वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा दोघेही गेल्या महिन्याभरापासून संघाबाहेर आहेत. या दोघांच्या फिटनेसबाबत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “तिलक वर्मा दुखापतीतून सावरतोय. मी ऐकलं तो २ आणि ४ फेब्रुवारीला मुंबईत २ सामने खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. मला वाटतं दोन सामने पुरेसे आहेत. माझं कालच त्याच्यासोबत बोलणं झालं, त्याने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण करायला सुरुवात केली आहे. मी आशा करतो की, लवकरच तो आमच्यासोबत असेल.”

तसेच वॉशिंग्टन सुंदरबाबत बोलताना सूर्यकुमार यादव म्हणाला, “मला वाटतं वॉशी (वॉशिंग्टन) देखील चांगली कामगिरी करत आहे. माझं त्याच्यासोबतही बोलणं झालं, त्यानेही गोलंदाजी आणि फलंदाजी करणं सुरू केलं आहे. आशा करतो, तो पण लवकरच पुनरागमन करेल.” आता वॉशिंग्टन सुंदर आणि तिलक वर्मा भारतीय संघात पुनरागमन करणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

टी-२० वर्ल्डकप २०२६ स्पर्धेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल (उपकर्णधार), रिंकू सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, वॉशिंग्टन सुंदर, इशान किशन (यष्टीरक्षक).