Suryakumar Yadav Viral Video: भारतीय संघाने २०२६ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळताना जेतेपदाची ट्रॉफी उंचावली होती. सूर्याने नेतृत्व दमदार केलं, पण फलंदाजीत हवी तशी कामगिरी करू शकला नव्हता. त्यामुळे त्याला कर्णधारपद आणि संघातील स्थान गमवावं लागलं होतं. सध्या तो भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी जोरदार प्रयत्नशील आहे. यादरम्यान त्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

सूर्यकुमार यादव भारतीय संघाचा भाग नसला, तरीदेखील त्याची लोकप्रियता काही कमी झालेली नाही. अजूनही सूर्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते तुफान गर्दी करतात. यादरम्यान सोशल मीडियावर एक व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये सूर्या कारमधून उतरताना दिसून येत आहे. यादरम्यान चाहते ऑटोग्राफ घेण्यासाठी आणि सूर्यासोबत फोटो क्लिक करण्यासाठी धावत येतात. एका चाहत्याला त्याच्याकडून ऑटोग्राफ हवा असतो, पण त्याच्याकडे पेनही नसतो आणि पेपरही नसतो. त्यावेळी सूर्या स्वत: आपल्या कारमधून पेन आणि पेपर घेतो आणि त्या चाहत्याला ऑटोग्राफ देतो. सूर्याच्या या मोठेपणाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

काही दिवसांपूर्वी सूर्यकुमार यादवने मुंबईतील प्रो गोविंदा या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. सूर्यकुमार यादवची प्रो गोविंदाचा ब्रँड अँबेसेडर म्हणून नेमणूक करण्यात आली होती. या स्पर्धेतील फायनलच्या दिवशी सूर्याने हजेरी लावली होती. यादरम्यान तो गोविंदांसोबत घेऊन टाक या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसून आला होता. त्याच्या या डान्सचे व्हिडीओही सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते.

सूर्यकुमारचा रेकॉर्ड

सूर्यकुमार यादवने भारतासाठी टी-२० क्रिकेट खेळताना दमदार कामगिरी केली. त्याला १०० हून अधिक सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. ११३ टी-२० सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने ३६.४ च्या सरासरीने ३२७२ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ शतकं आणि २५ अर्धशतकं झळकावली. यादरम्यान ११७ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी ठरली. तर वनडे क्रिकेटमधील ३७ सामन्यांमध्ये फलंदाजी करताना त्याने २५.८ च्या सरासरीने ७३६ धावा केल्या. यादरम्यान त्याने ४ अर्धशतकं झळकावली.