Suryakumar yadav on Abhishek Sharma: भारतीय संघाने न्यूझीलंडविरूद्ध दुसरा टी-२० सामना जिंकत मालिकेत २-० अशी आघाडी घेतली आहे. दुसऱ्या टी-२० सामन्यात टीम इंडियात पुनरामगन केलेल्या इशान किशन व कर्णधार सूर्यकुमार यादव यांनी संघाला विजयापर्यंत नेलं. दुसऱ्या सामन्यात भारतासमोर विजयासाठी २०९ धावांचं लक्ष्य दिलं होतं. हे लक्ष्य ईशान किशन व सूर्यकुमार यादवच्या खेळीच्या जोरावर संघाने १५.२ षटकांत गाठलं. या खेळीनंतर सूर्यकुमार व इशान किशनचा बीसीसीआयने व्हीडिओ शेअर केला आहे, या व्हीडिओमध्ये सूर्याने अभिषेकचा उल्लेख करत मोठं वक्तव्य केलं आहे.

भारताला विजयासाठी या सामन्यात २०९ धावांचं आव्हान दिलं होतं. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने ६ धावांत २ विकेट्स गमावल्या. संजू सॅमसननंतर अभिषेक शर्माही माघारी परतला. या सामन्यात अभिषेक शर्मा गोल्डन डकवर बाद झाला, पण त्यानंतर इशान किशन (७६) आणि सूर्यकुमार यादव (८२) यांनी त्यांच्या स्फोटक खेळींनी मोठे लक्ष्य संघाला सहज गाठून दिले.

बीसीसीआयने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये सूर्यकुमार यादवने इशान किशनचे कौतुक केलं आणि त्याला विचारलं, “लक्ष्य २०९ धावांचे होतं, ६ धावांत २ विकेट पडल्या आहेत. मी माझ्या आयुष्यात कधीही कोणालाही अशी फलंदाजी करताना पाहिलेलं नाही. आत असं नेमकं काय घडलं होतं?” यावर इशान किशन म्हणाला, “बॉल खूप चांगल्या पद्धतीने माझ्या बॅटवर येत होता, मला एकदाही असं वाटलं नाही की न्यूझीलंडचे गोलंदाज मला चांगल्या चेंडूने बाद करतील. चांगला चेंडू जरी टाकला तरी त्यावर मला आरामात खेळता येईल असं वाटलं.”

इशान किशनने सूर्याला विचारलं की त्याच्या मनात या खेळीदरम्यान काय सुरू होतं? सूर्याने उत्तर दिले, “आपल्या घरीही एक प्रशिक्षकही बसलेला असतो, जिच्याशी मी लग्न केलं आहे. ती मला हेच सांगत होती की मैदानावर थोडा वेळ काढ आणि मग खेळ. ती मला चांगलं ओळखते, म्हणून मी विचार केला, चला थोडा वेळ घेऊया. मी मागच्या सामन्यातही वेळ घेऊन खेळलो होतो आणि आजही तेच केलं. मी नेटमध्ये चांगला खेळत होतो, पण सामन्यांमध्ये धावा होत नव्हत्या. मग आता ब्रेक मिळाला होता, तेव्हा घरी गेलो आणि सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर राहिलो. ३ आठवडे चांगला सराव केला आणि माईंड स्पेस चांगली होती. स्वत:ला खूश ठेवणंदेखील महत्त्वाचं आहे.”

सूर्यकुमार यादव अभिषेक शर्माबद्दल असं का म्हणाला?

सूर्यकुमार यादव यादरम्यान बोलताना अभिषेक शर्माचा उल्लेख करत म्हणाला, “जगासमोर या चर्चा पण बंद करायच्या होत्या की फक्त अभिषेक शर्माने धावा केल्या तरच भारत जिंकेल. पण भाई इशानने धावा केल्या तरी भारत जिंकेल. अभिषेक शर्मा पण माझा आवडता फलंदाज आहे, त्याने प्रत्येक सामन्यात धावा कराव्या असं मला वाटतं. हा टीम गेम आहे, ११ लोकांच्या योगदानामुळेच संघ जिंकतो.”

आता भारताचा न्यूझीलंडविरूद्ध तिसरा टी-२० सामना रविवारी २५ जानेवारीला गुवाहाटीमध्ये होणार आहे. हा तिसरा सामना जर भारताने जिंकला तर संघ मालिका आपल्या नावे करणार आहे.