Suryakumar Yadav Ishan Kishan: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दुसरा सामना रायपूरमध्ये खेळवला जात आहे. या सामन्यात भारताच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी शाळा घेतली. अडीज वर्षांनंंतर ईशान किशनला भारतीय संघात संधी मिळाली आणि त्याने संघासाठी मॅचविनिंग इनिंग खेळी करत संघाला संकटातून सावरलं. ईशान किशन या सामन्यात ७६ धावा करत बाद झाला. ईशान बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादवने जे मैदानावर केलं त्या कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत.

भारत-न्यूझीलंड मालिकेतील दुसरा सामना इशान किशनसाठी खास ठरला. न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करत २०८ धावा केल्या आणि प्रत्युत्तरात इशान किशनने भारताकडून धमाकेदार खेळी करत संघाला मजबूत स्थितीत आणलं. त्याने फक्त ३२ चेंडूत ११ चौकार आणि चार षटकारांसह ७६ धावा केल्या. त्याचा स्ट्राईक रेट यादरम्यान २३७.५० होता, ज्यामुळे न्यूझीलंडच्या गोलंदाजांची निराशा झाली.

इशान किशनची खेळी देखील खास ठरली, कारण संघाने त्यांचे दोन्ही सलामीवीर लवकर गमावले होते. संजू सॅमसन ६ धावांवर बाद झाला आणि अभिषेक शर्मा तर गोल्डन डकवर बाद झाला होता, यामुळे भारतीय संघ चांगलाच अडचणीत होता. सूर्यकुमार नुकताच फॉर्मात परतत होता आणि तिलक वर्मासारखा तारणहारदेखील नव्हता. त्यामुळे संघाचा डाव कोण सावरणार असा प्रश्न असताना ईशान किशनने पुढे येत संघाचा डाव सावरला.

ईशान किशनने २१ चेंडूत अर्धशतक पूर्ण केलं आणि त्यानंतरही त्याने न थांबता वादळी फटकेबाजी केली. ईशान किशनच्या फटकेबाजीमुळे सूर्यकुमार यादवला वेळ घेत त्याचा डाव साकारण्याची संधी मिळाली. सूर्यकुमार यादव व ईशान किशन यांनी ४८ चेंडूत १२२ धावांची भागीदारी रचली. ईशान किशन त्याच्या खेळीदरम्यान १०व्या षटकात मोठा फटका खेळायला गेला आणि तितक्यात चेंडू हवेत उंच गेल्याने तो झेलबाद झाला.

ईशान किशन बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव त्याच्याजवळ गेला आणि त्याला शाबासकी देत भावुक होत मैदानावरच मिठी मारली. कर्णधार व खेळाडू म्हणून सूर्यकुमार यादवने ज्याप्रमाणे ईशान किशनच्या खेळीचं कौतुक केलं, ते पाहून सर्वच जण सूर्यादादाचं कौतुक करत आहेत. सूर्याबरोबरच सर्व खेळाडूंनी त्याला शाबासकी देत त्याचं कौतुक केलं.